नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरात कचऱ्याची समस्या नेहमीच गंभीर बनलेली आहे. एन नव्या वर्षाच्या तोंडावर शहरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असल्याने महापालिका प्रशासनाच्या या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांमध्ये मनपा प्रशासना विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. भिवंडी मनपा कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर महिन्याला पावणेदोन कोटी रुपये खर्च करत असतानाही शहरातील कचरा समस्या गंभीर बनली आहे.
शहरातील कचरा समस्ये सोडविण्यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी स्वतः मनपा आयुक्तांची भेट घेऊन शहरातील कचरा समस्यावर मार्ग काढण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला केल्या होत्या. यावर एका महिन्यात कचरा शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यात येईल असे आश्वासन देखील मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी आमदार रईस शेख यांना दिले आहे. मात्र आमदारांच्या भेटीनंतर ही शहरात कचरा समस्या जैसे थे अशीच राहिली आहे. शहरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड कचऱ्याचे ढीग साचले आहेत. भिवंडी कल्याण रोड परिसरात उड्डाणपुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. तर धामणकरनाका उड्डाणपुलाच्या खाली पिलर जवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले असून मनपा मुख्यालयाच्या आजूबाजूला देखील कचरा साचलेला आहे.
एकीकडे कोट्यावधीची वाहने ठेकेदाराला आनंद देऊन महापालिका प्रशासनाने आधीच ठेकेदारांवर मेहरबानी केली आहे.मात्र दुसरीकडे कचरा उचलण्यात ठेकेदाराची हलगर्जी होत असल्याच्या घटना वेळोवेळी समोर आलेले आहेत. जेव्हा जेव्हा शहरात कचऱ्याचे ढीग साचलेले असतात त्यावेळेस महापालिका प्रशासनाच्या वतीने ठेकेदार निलंबित करून दुसरा ठेकेदार नियुक्त करण्यात येईल असे सांगण्यात येते मात्र प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाकडून ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे शहरातील कचरा समस्या गंभीर बनली आहे.