मुंबई : आयटीआय प्रवेशाचा तिसरा कॅप राउंड नुकताच संपला असून, चौथ्या कॅप राउंडच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, प्रवेशाच्या तीन फेऱ्यांनंतरही राज्यातील आयटीआय प्रवेशात केवळ ३६ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. मागील वर्षी तिसऱ्या फेरीनंतर राज्यात आयटीआयचे तब्बल ६६ हजार ४३१ प्रवेश निश्चित झाले होते. ही टक्केवारी ४४ टक्के इतकी होती.यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अर्ज करून, त्यांना अलॉटमेंट मिळूनही त्यांनी प्रवेश निश्चिती केली नाही. यामागे त्यांची बेताची आर्थिक परिस्थिती, स्थलांतर किंवा इतर ठिकाणी अभ्यासक्रमांना प्रवेश अशी कारणे असू शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली.राज्यात आयटीआय प्रवेशासाठी कॅप राउंडच्या १ लाख ३२ हजार ९३१ आणि संस्था स्तरावरील, अल्पसंख्याक जागा मिळून एकूण १ लाख ४६ हजार ५२ जागा उपलब्ध आहेत. यंदा पहिल्या कॅप राउंडमध्ये ८८,०६० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली, मात्र २६, ८८१ विद्यार्थ्यांनी म्हणजे केवळ ३० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली.त्यानंतर ५ ते ८ डिसेंबरदरम्यान मराठा आरक्षण जागा वगळून दुसरा कॅप राउंड पार पडला. या वेळी केवळ १८.८० टक्के तर तिसऱ्या राउंडमध्ये २०.८९ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.२०१९ मध्ये पहिल्या कॅप राउंडला ३२ हजार २६०, दुसऱ्या कॅप राउंडला १३ हजार ९०९, तिसऱ्या कॅप राउंडला २० हजार २६२ प्रवेश निश्चित झाले होते. मागील वर्षीपेक्षा यंदा तिसऱ्या फेरीपर्यंत ८ टक्क्यांनी प्रवेश निश्चिती कमी झाली. चौथा कॅप राउंड आणि कौन्सिलिंग फेरी, संस्था स्तरावरील प्रवेश अद्याप बाकी आहेत.
आयटीआय प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीनंतरही केवळ ३६ टक्के प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 6:25 AM