संघटनेच्या माघारीनंतरही एसटी ठप्पच; पण, आझाद मैदानातील कर्मचारी संख्येत घट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 09:34 AM2021-12-22T09:34:25+5:302021-12-22T09:35:14+5:30
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करायला हवे, यासाठी कामगार युनियन मंत्रालयावर महामोर्चा काढणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेने सोमवारी संपातून माघार घेतली होती. त्यामुळे मंगळवारी एसटीची वाहतूक पूर्ववत होईल, असा दावा महामंडळाने केला होता. मात्र, महामंडळाचा दावा फोल ठरला. मंगळवारी २०९३४ कर्मचारी कामावर, तर २९१६ एसटी धावल्या. महामंडळाने कर्मचाऱ्यांवरील सर्व कारवाया मागे घेण्यात येतील; परंतु त्यासाठी कर्मचाऱ्यांची कामावर हजर व्हावे, असे परिपत्रक मंगळवारी काढले.
महामंडळाच्या परिपत्रकात संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी २२ डिसेंबरपर्यंत, तर मराठावाडा, अमरावती व नागपूर येथील कर्मचाऱ्यांनी २३ डिसेंबरपर्यंत हजर हाेण्यास सांगितले. जे कर्मचारी कामावर हजर हाेतील, त्यांच्यावरील निलंबन, बडतर्फी शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार मागे घेण्यात येईल, असे म्हटले आहे. याशिवाय ज्यांची सेवा समाप्ती झाली आहे, त्यांना कायदेशीर प्रक्रियेचे अनुपालन करून सेवा समाप्ती मागे घेतली जाईल. ज्यांची बदली केली आहे, त्यांची बदली राेखण्यात येईल, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मागे घेण्यात येतील, असेही स्पष्ट केले आहे.
कामगार युनियनचा मोर्चा
गेल्या दीड महिन्यापासून राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घेतली नाही. एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण हवे आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारने विधेयक मंजूर करायला हवे, यासाठी २२ डिसेंबर राेजी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयावर महामाेर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचे संघर्ष एसटी कामगार युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले.
आझाद मैदानातील कर्मचारी संख्येत घट
- राज्यात मागील दीड महिन्यापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचारी संपातून महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी सोमवारी एसटी संपातून माघार घेतली.
- त्यामुळे मंगळवारी आझाद मैदानातील आंदोलकांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र होते. असे असले तरी काही कर्मचारी संपावर ठाम असल्याने संपाचा तिढा असूनही कायम आहे.