वर्ष उलटल्यावरही शाळांच्या खात्यात मानधनाचे पैसे जमा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 12:45 PM2018-05-10T12:45:26+5:302018-05-10T12:45:26+5:30
११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून ऑनलाईन अर्जाचा भाग-१ भरून देण्याची जबाबदारी शाळांच्या मुख्याध्यापकांवर देण्यात आली आहे.
मुंबई : ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून ऑनलाईन अर्जाचा भाग-१ भरून देण्याची जबाबदारी शाळांच्या मुख्याध्यापकांवर देण्यात आली आहे. परंतू मागील वर्षीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा मेहनताना वर्ष उलटून गेल्यावर सुद्धा शाळांच्या खात्यात जमा झाला नसून शाळांचे मुख्याध्यापक नाराज आहेत. त्यामुळे मुंबईतील शाळांना देय असलेली ११ वी ऑनलाईन प्रक्रियेतील शुल्काची रक्कम देण्यात शिक्षण विभाग टाळाटाळ करीत असून शाळांचे पैसे हडप करायचे आहे काय ? असा संतप्त सवाल अनिल बोरनारे यांनी मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालक व शिक्षण निरीक्षक कार्यालयांना केला आहे.
विशेष म्हणजे मानधनाचे पैसे शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडे वर्ग करून महिना उलटून गेल्यावरही शाळांना पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. या प्रश्नांबाबत अनिल बोरनारे यांनी मुंबईतील शाळांना तातडीने रक्कम न मिळाल्यास यंदाच्या ११ वी ऑनलाईन प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा इशारा २० मार्च रोजी शिक्षण उपसंचालकांना दिला होता. शिक्षण उपसंचालकांनी त्यावर लेखी उत्तर देत कार्यवाही सुरू करीत असल्याचे सांगितले व बहिष्कार मागे घेण्याबाबत आवाहन केले होते
मुंबई विभागात दरवर्षी ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येते त्यासाठी विद्यार्थ्यांकडून नोंदणीसाठी २५० रुपये शुल्क आकारण्यात येते. हे शुल्क आकारण्याची जबाबदारी शाळांकडे असते. शाळा एकत्रित रक्कम ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने काढलेल्या बँकेच्या खात्यात जमा करते. शाळा प्रत्येक विद्यार्थ्यांचे रेजिष्ट्रेशन व ऑप्शन फॉर्म भरून घेतात यासाठी शाळेला स्वतःचा स्टाफ वापरावा लागतो एका विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून घेण्यासाठी साधारणपणे १५ मिनिटे लागतात विद्यार्थी संख्या पाहता यात शाळांचा खूप वेळ जातो. यासाठी शाळेला नेट चार्ज, प्रिंटर्स, मदतनीस टेक्निशियन व स्टेशनरी साठी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे काही हिस्सा दिला जातो. दोन वर्षांपूर्वी ५० रुपये दिले होते तर मागीलवर्षी ३० रुपये देण्याचे कबूल करूनही अद्यापपर्यंत वर्ष उलटले तरी रक्कम शाळांना वितरित केली नाही
दरवर्षी मुंबई महानगरक्षेत्रात १० वी उत्तीर्ण होऊन हजारो विद्यार्थी ११ वी साठी ऑनलाईन प्रवेश घेतात त्यांची एकत्रित रक्कम लाखो रुपये होते त्यातील शाळांचा मेहनताना म्हणून प्रती विद्यार्थी रक्कम प्रवेश प्रक्रिया संपल्यावर मिळणे अपेक्षित असतांनाही वर्ष उलटून गेल्यावर शाळांना रक्कम वितरित झालेली नसल्याने शाळा प्रशासनाकडून संताप व्यक्त केला जात आहे.