Join us  

...तरीही सेना राज्य पक्षच!

By admin | Published: May 23, 2014 2:36 AM

- देशात जागा मिळविण्यात शिवसेना हा सहाव्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मात्र सेनेची अन्य राज्यात अत्यल्प कामगिरी असल्याने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मात्र पक्षाला मिळू शकत नाही.

सुधीर लंके, मुंबई/अहमदनगर - देशात जागा मिळविण्यात शिवसेना हा सहाव्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मात्र सेनेची अन्य राज्यात अत्यल्प कामगिरी असल्याने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मात्र पक्षाला मिळू शकत नाही. तर स्वाभिमानी पक्षही राज्य पक्षाच्या यादीत येऊ शकत नाही. शरद पवार यांच्या माध्यमातून राष्टÑवादी हा राष्टÑीय पक्ष महाराष्टÑातून निर्माण झाला. या पक्षाला लोकसभेत कधीही दोन अंकी जागा मिळाल्या नाहीत. मात्र अन्य राज्यातील कामगिरीच्या जोरावर राष्टÑवादीने राष्टÑीय पक्षाचा दर्जा मिळविला होता. या वेळी मात्र त्यांचा हा दर्जा धोक्यात आला असल्याचे वृत्त मंगळवारी‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. राष्टÑवादीपेक्षा सातत्याने जास्त खासदार निवडून आणणार्‍या सेनेला या वेळी तब्बल १८ जागा मिळाल्या आहेत. देशात भाजपा, काँग्रेस, एआयएडीएमके, तृणमूल, बिजू जनता दल यांच्यानंतर सर्वाधिक जागा मिळविण्याची ख्याती सेनेच्या नावावर जमा झाली आहे. मात्र तरीदेखील सेना राष्टÑीय पक्ष मात्र बनू शकत नाही. राष्टÑीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी ४ राज्यांतून प्रत्येकी ६ टक्के मते किंवा ३ राज्यांतून ११ खासदार अथवा पक्षाला ४ राज्यांत राज्य पक्षाचा दर्जा हवा. मात्र या अटींची पूर्तता सेनेकडून होत नसल्याने त्यांना राज्य पक्ष म्हणूनच राहावे लागणार आहे. शिवसेना अन्य राज्यांत विधानसभा निवडणुका लढविते. मात्र तेथे सेनेला एक टक्काही मते मिळविता आलेली नाहीत. मनसेची या निवडणुकीत दैना उडाली. मात्र गत विधानसभेत या पक्षाला १३ जागा व ११.८८ टक्के मते मिळालेली असल्यामुळे त्या जोरावर मनसेचा राज्य पक्षाचा दर्जा व त्यांचे ‘इंजिन’ चिन्ह विधानसभेत कायम राहणार आहे. स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी निवडून आले. मात्र या पक्षाला राज्यात ६ टक्के मते मिळविता आली नसल्याने हा पक्ष या वेळीही राज्य पक्ष बनू शकत नाही. शेकाप, भारिप बहुजन महासंघ, जनसुराज्य शक्ती, लोकसंग्राम हे इतर पक्ष राज्य दर्जापर्यंतही पोहोचलेले नाहीत.