मोठी बातमी! नरेंद्र मोदी मुंबईत येण्यापूर्वीच बीकेसीत लावलेली स्वागत कमान कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 02:49 PM2023-01-19T14:49:25+5:302023-01-19T14:49:47+5:30
ज्याठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे तिथे लावण्यात आलेली स्वागत कमान कोसळली आहे.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून याठिकाणी ते विविध विकासकामांचे उद्धाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी गेल्या आठवडाभरापासून मुंबईत भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना जय्यत तयारी करत आहेत. बीकेसीत मोदींच्या सभेला जास्तीत जास्त गर्दी करण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. मोदी मुंबई दौऱ्यावर असल्याने शहरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे पोस्टर झळकवण्यात आलेत.
मात्र ज्याठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे तिथे लावण्यात आलेली स्वागत कमान कोसळली आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. स्वागत कमान कोसळल्यानंतर तात्काळ आयोजकांकडून पुन्हा कमान उभारण्याचं काम हाती घेण्यात आले. मात्र कमान कोसळली तेव्हा तिथे लोकांची गर्दी झाली. ही गर्दी हटवण्याचं काम बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडून करण्यात आले. मोदी मुंबईत येण्यापूर्वीच ही कमान कोसळल्यानं त्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे. बीकेसीत सभा ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही कमान लावण्यात आली होती. कमान कशी कोसळली हे अद्याप कळू शकलं नाही. परंतु कमान कोसळल्यानंतर तात्काळ ती पुन्हा उभारणीचं काम सुरू करण्यात आले.
पंतप्रधान मोदींचा दौरा अन् जय्यत तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी मुंबईत ३८ हजार कोटी रुपये मूल्याच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करत महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. १ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्जही यावेळी वितरित होणार आहे. मोदींच्या दौऱ्यासाठी शहरात पोस्टर, झेंडे झळकवण्यात आले आहेत.
या प्रकल्पांचे लोकार्पण
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्गिका २ अ म्हणजेच दहिसर पूर्व - डी. एन. नगर या ६ हजार ४१० कोटींच्या प्रकल्पासह मेट्रो मार्ग ७ म्हणजे अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व हा ६ हजार २०८ कोटींचा मेट्रो प्रकल्प.
पालिकेचे २० नवीन आपले दवाखाने
या प्रकल्पांचे भूमिपूजन
१७ हजार १८२ कोटींचे ७ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प- पालिकेच्या तीन रुग्णालयांचे १ हजार १०८ कोटींचे बांधकाम.
६,०७९ कोटी रुपयांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील १ हजार ८१३ कोटींच्या पुनर्विकासाचे काम
काँक्रिटीकरण...
३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात येईल. या उपक्रमामुळे मुंबई खड्डेमुक्त होण्यास मदत होईल.
या कामांसाठी अंदाजे ६,०७९ कोटी इतका खर्च येईल. पुढील २४ महिन्यांत हे काम पूर्ण होईल. या कामांतर्गत शहर भागात ७२ किमी.
लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. पूर्व उपनगरात ७१ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत, तर पश्चिम उपनगरात २५४ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. यांनुसार तीनही क्षेत्रात एकूण ३९७ किमी. लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.