Join us

उमेदवारी जाहीर होण्याआधीच ठाकरेसेनेचे विनोद घोसाळकर लागले प्रचाराच्या कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 7:14 AM

काँग्रेस आणि उद्धवसेनेतील वादामुळे हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येणार हे अजून ठरलेले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्तर मुंबईत लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना कुणाशी लढत द्यावी लागणार, हे अनिश्चित असताना उद्धवसेनेचे माजी आमदार आणि स्थानिक नेते विनोद घोसाळकर यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका, मतदारांच्या भेटीगाठींवर भर द्यायला सुरुवात केली आहे.

काँग्रेस आणि उद्धवसेनेतील वादामुळे हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येणार हे अजून ठरलेले नाही. त्यात सहापैकी चार लोकसभा मतदारसंघात परस्पर उमेदवारी घोषित करून उद्धवसेनेने मुंबईबाबत आपण तडजोडीला तयार नसल्याचे दाखवून दिले आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीत राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू आहे. त्यासाठी उद्धवसेनेने जाहीर केलेल्या मतदारसंघांपैकी आपल्याला अनुकूल असा मतदारसंघ वाटाघाटीत पदरी पाडून घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. अशी वेळ आल्यास निदान उत्तर मुंबई मतदारसंघ तरी आपल्या हाती राहील, अशी उद्धवसेनेची खेळी आहे. अर्थात या खेळीला यश येईल तेव्हा येईल, सध्या तरी मतदारसंघाच्या बांधणीकडे लक्ष देत विनोद घोसाळकर यांनी जनसंपर्क वाढवायला सुरूवात केली आहे.

शाखाप्रमुख ते आमदारकी असा राजकीय प्रवास असलेले घोसाळकर यांना केवळ पश्चिम उपनगरांतील समस्यांची चांगलीच जाण आहे. पाणीटंचाईपासून रेल्वेच्या झोपड्यांच्या पुनर्वसनापर्यंत अनेक प्रश्नांवर गेल्या काही वर्षांत त्यांनी काम केले आहे. इथल्या स्थानिक प्रश्नांची चांगलीच जाण त्यांना आहे. ‘स्थानिक प्रश्नांची जाण असलेला नेता’ या आपल्या जनसामान्यांतील प्रतिमेचा वापर घोसाळकर करताना दिसून येत आहेत.

देवदर्शनातून प्रचाराची संधी विनोद घोसाळकर यांचा मागाठाणे, दहिसर, बोरीवली, कांदिवली, चारकोप, मढ आदी भागांतील केवळ मराठीच नव्हे तर अन्य भाषिक मतदारांशी संपर्क साधण्याकडे कल आहे. भाजपप्रमाणे मंदिरांना भेटी देत ते भाविकांशी संवाद साधत आहेत. आतापर्यंत १००हून अधिक लहान-मोठ्या मंदिरांनी त्यांनी भेटी दिल्या आहेत. मतदारांशी संवाद साधण्याबरोबरच महिला, युवा, व्यापारी सेनेच्या कार्यकर्त्यांशी त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत.

टॅग्स :लोकसभामुंबईनिवडणूकलोकसभा निवडणूक २०२४शिवसेना