मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपा-शिवसेना(BJP-Shivsena) यांच्यात आरपारची लढाई होण्याची शक्यता आहे. २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेने भाजपाशी फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. शिवसेनेने विश्वासघात केला असा आरोप भाजपा नेते वारंवार करतात. त्याचाच बदला घेण्यासाठी भाजपानं मुंबई महापालिकेसाठी कंबर कसली आहे.
गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) मुंबईतील मेट्रो २ अ, मेट्रो ७ या मार्गाचं उद्धाटन करणार आहे. मुंबईकरांसाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा असून त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर होणार आहे. मात्र त्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने मुंबई शहरात बॅनर्स झळकावत शिवसेनेला डिवचण्याचं काम केले आहे. “काम केलय, मुंबईन पाहिलय, धन्यवाद देवेंद्रजी..अशा आशयाचे होर्ग्डिंस वांद्रे आणि आसपासच्या परिसरात झळकावण्यात आले आहे.
एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रो मार्गाचं उद्धाटन होणार आहे तर दुसरीकडे मेट्रो उद्धाटनावरून भाजपाने मेट्रो प्रकल्पासाठी त्यांच्या सरकारच्या काळात मंजूर झालेल्या निधीचा बॅनर्स लावले आहेत. मुंबईतील ३३७ किमी मेट्रो प्रकल्पासाठी १ लाख ४० हजार ४३३ कोटी मंजूर करण्यात आले होते. भाजपा सरकारच्या काळात मुंबईत मेट्रो कामाला सुरूवात झाली. त्यामुळे उद्धाटन महाविकास आघाडी सरकारमध्ये होत असले तरी त्याचे श्रेय भाजपाचेच आहे असा दावा या बॅनर्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंच्या निवासस्थान परिसरात हे बॅनर्स लावण्यात आल्याने त्याची विशेष चर्चा होत आहे. मुंबईकरांना मेट्रो ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामुळेच मिळाली असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मेट्रो उद्धाटनाआधीच मुंबईत शिवसेना-भाजपा यांच्यात राजकारण तापल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईच्या मेट्रो सेवांमध्ये आणखी दोन मेट्रो मार्गांची भर पडणार आहे. दहिसर पश्चिम ते डहाणूकर वाडी अशी मेट्रो २ अ आणि आरे ते दहिसर पूर्व अशी मेट्रो ७ या दोन मार्गांना शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही मार्गांवर ९ स्टेशनवरून प्रत्येकी ९ किलोमीटरचा प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे.