Join us  

लोकसभेच्या निकालाआधीच भाजपमध्ये झाडाझडती सुरू; निष्क्रियांना दाखविणार घरचा रस्ता

By यदू जोशी | Published: May 28, 2024 1:28 PM

निवडणूक संपताच गुंडाळली विस्तारक योजना

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभा मतदारसंघासाठी एक आणि त्यातील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी सहा असे विस्तारक प्रदेश भाजपने नेमले होते. मात्र, लोकसभा निवडणूक संपताच ही योजना गुंडाळण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यात फेररचना केली जाणार असून, निष्क्रिय विस्तारकांना घरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे.

सर्व विस्तारकांची दोन दिवसांची बैठक २५ आणि २६ मे रोजी उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, माजी सहसंघटन मंत्री व्ही. सतीश व विस्तारक योजनेचे प्रदेश पालक रघुनाथ कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विस्तारकांकडून प्रत्येकी चार पानांचा फीडबॅक घेण्यात आला. पक्षसंघटनेच्या पातळीवर प्रत्यक्ष प्रचारात काय स्थिती होती, याबाबतची माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली.

संघटना पातळीवर घेणार आढावा

  • विस्तारक योजनेचा पूर्ण आढावा आता पक्षसंघटनेच्या पातळीवर घेण्यात येणार आहे. विस्तारकांचे गुणांकन करण्याची जबाबदारी विभागीय संघटन मंत्र्यांवर सोपविण्यात आली होती.
  • या गुणांकनानुसार आता चांगली कामगिरी करणाऱ्या विस्तारकांना पुन्हा संधी दिली जाईल किंवा पक्षसंघटनेत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. निष्क्रिय राहिलेल्यांना वगळले जाणार आहे. 
  • काही विस्तारकांनी अन्य जबाबदारी मिळण्याची विनंती केली, तर त्याबाबतही विचार केला जाईल. लोकसभा निवडणूक काळात काही विस्तारकांनी अपेक्षेप्रमाणे काम केले नाही, अशा तक्रारी होत्या. त्यांना वगळले जाणार आहे, असे सुत्रांनी सांगितले.

काय होती विस्तारक योजना?

  • ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी ४८ लोकसभा विस्तारक आणि २८८ विधानसभा विस्तारक नेमण्यात आले होते. मूळ लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ सोडून भाजपचे प्रमुख कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी यांना विस्तारक म्हणून अन्य मतदारसंघांमध्ये पाठविण्यात आले होते.
  • पेजप्रमुख, ३१ जणांची बूथसमिती, ११ जणांची कार्यविभाजन समिती नेमण्याची जबाबदारी या विस्तारकांकडे होती. 
  • या विस्तारकांनी महिन्यातून फक्त चार दिवस  आपल्या घरी जायचे आणि  उरलेले दिवस नेमून दिलेल्या मतदारसंघात कार्य करायचे, अशी पद्धत ठरविण्यात आली होती. शिंदे सेना आणि अजित पवार गटाकडील मतदारसंघांमध्येही भाजपने  विस्तारक नेमले होते.

प्रचार यंत्रणेतील त्रुटींचा अहवाल तयार करणार

  • प्रदेश भाजपने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पेजप्रमुखांच्या नियुक्त्यांपासून, बूथप्रमुख, कार्यविभाजन समिती अशी व्यापक यंत्रणा उभी केलेली होती.
  • प्रत्यक्ष निवडणुकीत या यंत्रणेचा किती फायदा झाला, याचा आढावा वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येणार आहे.
  • प्रचारात कोणत्या त्रुटी राहिल्या, याचा विस्तृत अहवाल तयार करण्यात येणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.
  • एवढी मोठी यंत्रणा उभी करूनही प्रत्यक्ष प्रचारात आणि मतदानाच्या दिवशी ती प्रभावीपणे काम करताना दिसली नाही, असे चित्र होते.

विधानसभेसाठी फेररचना

  • विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विस्तारक योजनेची फेररचना केली जाणार आहे. जूनअखेरीस ती पूर्ण होईल, सध्याच्या विस्तारकांना पुढील सूचना मिळेपर्यंत थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • प्रदेश भाजपचे पदाधिकारी, आघाड्यांचे प्रमुख, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांच्या निवडणुकीतील कामगिरीचाही आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
टॅग्स :भाजपालोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबई