‘बेस्ट’ कर्मचा-यांचाही भाऊबीजेला संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 05:19 AM2017-10-17T05:19:33+5:302017-10-17T05:19:49+5:30
ब-याच वाटाघाटीनंतर महापालिका कर्मचा-यांची दिवाळी गोड झाली. मात्र, बेस्ट कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत.
मुंबई : ब-याच वाटाघाटीनंतर महापालिका कर्मचा-यांची दिवाळी गोड झाली. मात्र, बेस्ट कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. यामुळे नाराज बेस्ट कामगारांनी ऐन भाऊबीजेच्या दिवशी चक्का जाम करण्याची तयारी केली आहे, तर बेस्टमध्ये रोजंदारीवर काम करणा-या कामगारांनी आजपासून वडाळा आगारात धरणे आंदोलन सुरू केले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने संपाचा इशारा दिला आहे. त्या पाठोपाठ बेस्ट कामगारही संपाच्या तयारीत आहेत. महापालिका कामगारांना साडेचौदा हजार बोनस जाहीर झाला. त्यामुळे बेस्ट कामगारांनाही बोनसची आशा होती, परंतु प्रशासनाने हात वर केल्यामुळे, या वर्षी बेस्टच्या ४४ हजार कामगारांची दिवाळी अंधारात आहे. याचे तीव्र पडसाद कामगारांमध्ये उमटत आहे. दरम्यान, रोजंदारीवर काम करणाºया कामगारांनीही आजपासून वडाळा आगारासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन आणि बेस्ट कामगार क्रांती संघ यांनी संयुक्तरीत्या या आंदोलनाची हाक दिली आहे. बेस्ट उपक्रमाने रोजंदारी कामगारांना किमान वेतन म्हणून, १५ हजार ३०९ रुपये व २४० दिवसांपेक्षा जास्त दिवस काम करणा-या रोजंदारी कामगारांना
सेवेत कायम करावे, असा कामगार आयुक्तांचा आदेश असल्याचा संघटनेचा दावा आहे. या आदेशानुसार बेस्ट प्रशासनाने निर्णय घेण्याची मागणी संघटनेने केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ऐन सणासुदीला संप झाल्यास मुंबईकरांचे हाल होणार आहेत.'
प्रशासनाचे हात वर
बेस्ट उपक्रमात ४४ हजार कामगार-अधिकारी आहेत. आंदोलनानंतर बेस्ट कामगारांचे वेतन वेळेत होत आहे. मात्र, आगामी आर्थिक वर्षात बेस्टची तूट ८८० कोटींवर पोहोचणार आहे. त्यामुळे बोनस देण्यास बेस्ट प्रशासनाने नकार दिला आहे, तर पालिकेने ही जबाबदारी उचलण्यास असमर्थता दर्शविली आहे.