मुंबई : खासगी कंपन्यांच्या वाढत्या प्रस्थामुळे भारतीय टपाल खात्याला मोठा फटका बसल्याच्या बातम्या आपण रोज वाचतो. पण, कोरोना काळात पोस्टाच्या मुंबई विभागाने विक्रमी कामगिरी करीत सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. देशभरात कोरोनाचा प्रकोप सुरू असताना मुंबई पोस्टाने अखंड सेवा देत तब्बल ४०० कोटींचा व्यवसाय केला आहे.कोरोनाने माणसा-माणसांत शारीरिक अंतर तयार केले असले, तरी भावनिक दुरावा निर्माण करण्यात तो सपशेल अपयशी ठरला. नात्यांतील वीण अतुट ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या असंख्य हातांची मेहनत त्यामागे आहे. टपाल विभागात हा त्यातील महत्त्वाचा घटक. या वैश्विक महामारीला न डगमगता मुंबई पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी अविरत सेवा देत भावनिक संदेशवहनाचे काम केले. त्यामुळेच ही कामगिरी शक्य झाली.याविषयी बोलताना मुंबईच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे म्हणाल्या, मुंबईत कोरोनाचा प्रकोप सुरू असतानाही टपाल विभागाचे सर्व विभाग खुले होते. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. हाती पैसे नसल्याने खायचे काय, असा पेच निर्माण झाला. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन आम्ही ‘डोअर स्टेप’ सुविधा दिली. खातेधारकांकडून टपाल कार्यालयात फोन गेला की त्यांना तत्काळ पैसे पोहोचते करण्यासाठी व्यवस्था उभी केली. केवळ पत्रांची देवाणघेवाण नाही, तर अत्यावश्यक साहित्याची वाहतूक करण्यातही पोस्टाने महत्त्वाची भूमिका बजावली. मास्क, पीपीई किटसह सर्व वैद्यकीय सामग्री देशभरात पोहोचवली. या काळात इतर सर्व वितरण व्यवस्था बंद होत्या. त्यामुळे बहुतांश कॉर्पोरेट कंपन्यांचे व्यवहार आम्ही सांभाळले. या सगळ्याचा परिपाक म्हणून गेल्या आर्थिक वर्षात ही विक्रमी कामगिरी करता आली, असे पांडे यांनी सांगितले.वाशीमध्ये उभे राहणार पार्सल हबटपाल विभागातर्फे वाशी येथे पार्सल हब बनवण्याची योजना आखली जात आहे. ई-कॉमर्स कंपन्यांशी सामंजस्य करार करून व्यवसायवृद्धीचा प्रयत्न त्यामागे आहे. मुंबईतील सर्व पोस्ट ऑफिसमधून बुकिंग स्वीकारल्यानंतर सायंकाळी ते पार्सल हबमध्ये जमा केले जाईल. दुसऱ्या दिवशी ते गंतव्य स्थानी रवाना होईल.कोरोना संकटात आम्ही दर्जेदार सेवा दिली. त्यात एकही दिवस खंड पडू दिला नाही. त्यामुळे या काळात जोडल्या गेलेल्या कॉर्पोरेट कंपन्या आजही आमची सेवा घेतात. हा आलेख कायम चढता राखण्यासाठी प्रयत्नशील आहोत.- स्वाती पांडे, पोस्टमास्टर जनरल, मुंबई.दररोज किती पत्रे वितरित होतात - २ ते २.५ लाखदररोज किती पत्रे जमा होतात ३ लाखांहून अधिक
कोरोना संकटातही पोस्टाने केला 400 कोटींचा व्यवसाय; मुंबई विभागाची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 9:14 AM