थंडीतही मुंबईकरांना उन्हाचे चटके, कमाल तापमान वाढल्याचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 05:01 AM2019-01-20T05:01:55+5:302019-01-20T05:02:03+5:30
मुंबईचे किमान तापमान १६ तर कमाल तापमान शनिवारी ३५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ऐन थंडीत वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांना आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत.
मुंबई : मुंबईचे किमान तापमान १६ तर कमाल तापमान शनिवारी ३५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ऐन थंडीत वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांना आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत.
समुद्राहून मुंबईकडे वाहणारे खारे वारे स्थिर होण्यास उशीर होत असून, आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात येणारी वाढ यास कारणीभूत आहे, असे मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले.
मुंबईत शुक्रवारी किमान तापमान १६ तर कमाल ३० अंश सेलियस एवढे नोंदविण्यात आले होते. शनिवारी किमान तापमान १६ अंशांवर स्थिर असले तरी कमाल तापमानात वाढ झाली. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.
राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.८ अंश नोंदविण्यात आले. २० ते २३ जानेवारीदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, ११ अंशाच्या आसपास राहील. मुंबई, आसपासच्या परिसराचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, १६ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.