मुख्यमंत्री; संसर्गाचा धोका टळलेला नाही; गाफील न राहता आयुष्याला ब्रेक लागणार नाही याची दक्षता घ्या
मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ, भुयारी मार्गांचे भूमिपूजन, उड्डाणपुलांचे ई लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या लाटेत कडक निर्बंध असताना विकासाचा वेग मंदावला नाही. मुंबईला दिशा, वेग देणाऱ्या नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्यात आल्याने मेट्रोचे काम आखीव, रेखीव, देखणे झाले. कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, परिणामी गाफील न राहता आयुष्याला ब्रेक लागणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
डहाणूकरवाडी ते आरे स्थानकादरम्यानच्या मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ, पश्चिम द्रुतगती महामार्ग (टर्मिनल १ अणि २) येथील नियंत्रित प्रवेश भुयारी-उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, राजणोली उड्डाणपूल मार्गिका आणि दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिकांचा ई लोकार्पण सोहळा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाचे सावट आहे. मात्र, उपचारांच्या सुविधा निर्माण करतानाच महानगरांच्या विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही. मुंबई वाढतेय तसा तिच्या विकासाचा वेगही कायम राखत आहोत.
आदित्य ठाकरे म्हणाले, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी नियोजन केले आहे. महामार्गावर डिझाइन्स, हिरवळ तयार करून त्याचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. महामार्गावरील दहिसर ते माहिमपर्यंत सायकलिंग किंवा चालत जाण्याची सोय करण्याचे नियोजित आहे.
* हेरिटेज ट्री संकल्पना राबवणार - उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात एका दिवसात ३० किमी लांबीचा डांबरी रस्ता तयार करण्याचे काम झाले असून, त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. मुंबईतही रात्रीच्या बारा तासांत सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम हाती घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. वादळात झाडे उन्मळून पडल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी माझी भेट घेतली. त्यातून झालेल्या चर्चेनुसार हेरिटेज ट्री ही संकल्पना महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
.................................................