Join us

कोरोनाच्या काळातही पश्चिम रेल्वेची स्क्रॅप विक्रीतून १०० कोटींहून अधिक कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:06 AM

मुंबई : सर्व रेल्वे कार्यालये आणि युनिट्स स्क्रॅप मुक्त करण्यासाठी पश्चिम रेल्वेने मिशन झीरो स्क्रॅप ही मोहीम हाती घेतली ...

मुंबई : सर्व रेल्वे कार्यालये आणि युनिट्स स्क्रॅप मुक्त करण्यासाठी पश्चिम रेल्वेने मिशन झीरो स्क्रॅप ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत कोरोनाच्या काळातही यंदाच्या वर्षात स्क्रॅप विक्रीतून पश्चिम रेल्वेने १०२.३२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली चालू आर्थिक वर्षात ३० जुलैपर्यंत स्क्रॅप विक्रीतून १०० कोटींचा आकडा पार केला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. मागील वर्षी कोरोनाच्या कठीण काळात देखील पश्चिम रेल्वेने भंगार विक्रीतून २० टक्के अधिक नफा मिळविला.

मागील वर्षी पश्चिम रेल्वेचे ४१० कोटींचे भंगार विक्रीचे लक्ष्य होते; परंतु पश्चिम रेल्वेने भंगार विक्रीतून ४९१.४ कोटी रुपयांची कमाई केली. भारतीय रेल्वेच्या सर्व झोनमधील ही सर्वाधिक कमाई आहे.

सर्व युनिट व कार्यालये १०० टक्के स्क्रॅपमुक्त करण्याच्या उद्देशाने गेली तीन वर्षे पश्चिम रेल्वे सातत्याने भंगार विकत आहे. दरवर्षी ५०० कोटी रुपयांचे भंगार विकण्याचे उद्देश ठेवण्यात आले आहे. महाव्यवस्थापक कंसल आणि प्रधान मुख्य सामग्री व्यवस्थापक डी.के. श्रीवास्तव यांच्या निरीक्षणाखाली पश्चिम रेल्वेने झोनल रेल्वे पूर्णपणे स्क्रॅपमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

फोटो कॅप्शन : स्क्रॅपची विल्हेवाट आणि विक्रीसाठी पश्चिम रेल्वेवरील विविध रेल्वे युनिट व कार्यशाळांमधून स्क्रॅप विक्रीसाठी काढण्यात आले.