- सीमा महांगडेअरे ऊठ.. आंघोळ करून घे! ऊठ.. जेवून घे!! अशा कितीतरी हाका आणि विनवण्या आई-वडिलांकडून आल्या तरी; थांब गं ५ मिनिटं, माझा attack मिस होईल, माझा मित्र आॅनलाइन आहे, अशी उत्तरे सध्या मुलांकडून मिळत आहेत. ‘पबजी’ या गेमच्या विळख्यात तरुणाई अडकली असून वेळेचा होणारा अपव्यय पालकांची डोकेदुखी बनला आहे. पबजी या मोबाइल गेमने संपूर्ण तरुणाईला भुरळ पाडली आहे. इतकी की परीक्षेच्या काळातही महाविद्यालयात अथवा आपल्या खोलीत मुले तासन् तास हा गेम खेळतानाचे चित्र आहे. विविध टास्कच्या माध्यमातून मारधाड करणाऱ्या या गेमने सध्या सर्वत्रच धुमाकूळ घातला आहे.सोप्या पद्धतीने गेम मोबाइलवर उपलब्ध होत असल्याने त्याच्या आहारी जाण्याच्या घटना वाढत आहेत. परिणामी अभ्यासाच्या काळात थोडा टाईमपास व्हावा म्हणून रिलॅक्स होण्यासाठी हा खेळ खेळतात.एबघ, तो समोरून आला.. चल चल मागे.. चल बंदूक काढ.. घाल गोळी.. पळतोय बघ.. अरे मार ना.. वार कर... अशी वाक्ये सध्याच्या तरुणाईच्या तोंडात या गेममुळे फिट बसली आहेत. त्यामुळे परीक्षा काय, इव्हेंन्ट काय किंवा घरातील कामे काय सारे यापुढे त्यांना शून्य वाटत आहे. यापूर्वीदेखील ‘पोकेमॉन गो’, ‘ब्लू व्हेल’ यांसारख्या गेम्सनी मुलांना वेड लावले होते. त्यात आता ‘पबजी’ची भर पडली आहे. आकर्षक व्हिज्युअल्स आणि अॅक्शनमुळे हा गेम लोकप्रिय झाला आहे. हा खेळ ग्रुप करून खेळला जातो. गेम खेळण्याबरोबरच त्यात चॅटिंगही करता येते. मुळात हा खेळ अठरा वर्षांवरील मुलांसाठीच आहे. पण, त्यापेक्षा कमी वयाची मुलेही हा गेम जास्त खेळत असल्याचे दिसते. या गेममधील विविध खेळांमुळे मुलांमध्ये आक्रमकता वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.सोप्या पद्धतीने गेम मोबाइलवर उपलब्ध होत असल्याने त्याच्या आहारी जाण्याच्या घटना वाढत आहेत, यात शंका नाही. तरुणांनी हे गेम खेळायला हरकत नसली तरी ते किती वेळ खेळायचे, याला मर्यादा असायला हवी. दिवसभराच्या कामातून तुम्ही केवळ एक तास गेम खेळत असाल तर, विरंगुळा म्हणून ही बाब सामान्य आहे. पण, त्यापेक्षा अधिक काळ काम बाजूला ठेवून हा गेम खेळला जात असेल तर तरुण त्याच्या आहारी जात आहेत, असे म्हणायला वाव आहे. काम बाजूला ठेवून, विशेषत: परीक्षेच्या दिवसांतही गेम खेळण्याची इच्छा ज्यांच्यामध्ये जागृत होते अशांनी वेळीच यातून सावरायला हवे!
परीक्षांच्या दिवसांतही पबजी...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 1:49 AM