मुंबई : जून महिना उजाडला तरी अद्याप पावसाने मुंबईत खाते उघडलेले नाही. सर्वसाधारणपणे ७ ते १० जूनदरम्यान मान्सून मुंबईत दाखल होतो. मात्र या वर्षी मान्सूनपूर्व पावसानेही मुंबईत दडी मारली आहे. त्यातच १३ जूननंतर मान्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अद्यापही मुंबईचे कमाल तापमान चढेच आहे. सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश नोंदविण्यात आले असून, वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईचा विचार करता मुंबईचे कमाल तापमान ३४ ते ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. आर्द्रता ६० ते ७० टक्क्यांच्या आसपास आहे. कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर असले तरी आर्द्रतेमध्ये चढउतार नोंदविण्यात येत आहेत. परिणामी, उकाडा वाढत आहे. सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश तर आर्द्रता ६३ टक्के नोंदविण्यात आली आहे. परिणामी, वाढता उकाडा आणि तापदायक ऊन मुंबईकरांचा घाम काढत आहे.
राज्यासाठी अंदाज४ ते ६ जून - गोव्यासह राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.७ जून - कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.४ आणि ५ जून : विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येईल.६ आणि ७ जून : विदर्भात उष्णतेची लाट येईल.
मुंबईत आकाश ढगाळ राहील४ आणि ५ जून : आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४ आणि २९ अंशाच्या आसपास राहील.