Join us

सिगारेट ओढली तरी वाजणार फायर अलार्म; अंधेरीच्या कामगार रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा

By मनोहर कुंभेजकर | Published: August 13, 2023 1:44 PM

अशी यंत्रणा बसविल्याची माहिती कार्यकारी अभियंता, इएसआय रुग्णालय अश्वनी यादव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अंधेरीतील कामगार रुग्णालयाला १७ डिसेंबर २०१८ मध्ये आग लागली होती. यात १३ जणांचा मृत्यू आणि १५० जण जखमी झाले होते. ही घटना घडली तेव्हा रुग्णालयात  स्प्रिंकल, स्मोक डिटेक्टरच नव्हते. या घटनेतून प्रशासनाने धडा घेत अग्निशमन दलाच्या नियमावलींची कडक अंमलबजावणी केली आहे. २० टक्के ओपीडीच्या जागेत पुन्हा आग लागू नये म्हणून फायर सिस्टिमच्या सर्व यंत्रणा लावण्यात आल्या आहेत. साधी कोणी सिगारेट, विडी ओढली तरी येथे अलार्म वाजेल अशी यंत्रणा बसविल्याची माहिती कार्यकारी अभियंता, इएसआय रुग्णालय अश्वनी यादव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आगीची घटना घडल्यानंतर रुग्णालय बंदच ठेवण्यात आले होते. तब्बल ४ वर्षे ८ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ओपीडी सुरू होणार आहे. तर फेब्रुवारी २०२४ मध्ये संपूर्ण हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कामगार वर्गाकडून स्वागत 

-  अंधेरीच्या रुग्णालयात ओपीडी सुरू होणार असल्याने येथील कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.-  कांदिवलीच्या कामगार हॉस्पिटलमधील कर्मचारी, टेक्निशियन, डॉक्टर आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या ऑर्डर निघण्यास सुरूवात झाली आहे. तर अंधेरीतील हॉस्पिटल परिसराची स्वच्छता व रंगरंगोटी जोरात सुरू आहे.- ८० टक्के काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय कामगार कल्याण मंत्री भूपेंद्र यादव व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत  उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.

वारंवार घेतल्या होत्या बैठका

कामगारांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याने अंधेरीतील हे रुग्णालय लवकर सुरु करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुतुला यांनी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे केली होती. २९ जुलै, ११ जानेवारी, २१ फेब्रुवारी, ३ मार्च रोजी त्यांनी हॉस्पिटलचे काम सुरू करण्यासाठी नॅशनल बिल्डिंग्स कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (एनबीसीसी) सोबत आढावा बैठका घेतल्या.

 

टॅग्स :हॉस्पिटल