Join us

रक्तसाठा पुरेसा असला तरी गरजेनुसार शिबिरे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:07 AM

राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सध्या राज्यात ५५ हजार युनिट, तर मुंबईत १२ ...

राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्या राज्यात ५५ हजार युनिट, तर मुंबईत १२ ते १३ हजार युनिट रक्तसाठा उपलब्ध आहे. सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष आयाेजित करत असलेल्या रक्तदान शिबिरांमुळे समाधानकारक रक्तसाठा आहे. मात्र, रक्ताची गरज भासल्यास गरजेप्रमाणे शिबिरे घ्यावीत, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे.

शस्त्रक्रिया, प्रसुती, अपघातांवरील उपचारासाठी रक्ताची गरज सतत भासत असते. आता कोरोनानंतर रुग्णही उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत तर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. त्यामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते. लॉकडाऊनमुळे कोणीच शहराबाहेर गेले नसून, अपघातांचे प्रमाण कमी आहे. दरम्यानच्या काळात राज्य सरकारकडून केलेल्या आवाहनानंतर राज्यासह मुंबईकर नागरिकांनी रक्तदान शिबिरांना चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे सध्या राज्यातील वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमध्ये ५५ हजार रक्त युनिट एवढा रक्तसाठा उपलब्ध असून, तो किमान जून महिन्यापर्यंत पुरेल इतकाच आहे. तर, मुंबईत १२ ते १३ हजार युनिट रक्तसाठा शिल्लक आहे. अजूनही बऱ्याचशा रक्तपेढ्या माहिती भरत नाहीत. त्यामुळे, रक्तसाठ्याचा आकडा वाढलेलाही असू शकतो, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले. सामाजिक संस्थांनी रक्त वाया जाणार नाही, याची काळजी घेत गरजेनुसार रक्तदान शिबिरांचे आयाेजन करावे, असे आवाहन डॉ. थोरात यांनी केले.

.............................................