Join us

बापाच्या बापाचा बाप आला, तरी मुंबई तोडू शकणार नाही, महायुतीच्या बैठकीत शिंदे, फडणवीस, पवारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 7:20 AM

मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार तर नाहीच पण आम्ही मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणू. ज्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे ते मुंबई तोडणार म्हणत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुंबई : निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असल्याची आवई उठवणाऱ्यांनी मुंबईतील मराठी माणूस हद्दपार केला. कोणाच्या बापाच्या बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महायुतीच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता सुनावले. आपलीही हीच भूमिका असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

नीती आयोगाने मुंबई, वाराणसी, सुरत आणि विशाखापट्टणम या चार शहरांच्या आर्थिक विकासाची संकल्पना मांडल्यानंतर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याची टीका ठाकरे यांनी केली होती. त्याचा फडणवीस, पवार यांनी समाचार घेतला. या दोघांच्या भूमिकेला माझे पूर्ण समर्थन आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

कोरोना घोटाळा, छोडेंगे नहीकोरोना उपाययोजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे मुंबई महापालिकेत झाले. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाल्ले. कफनमध्येही पैसे खाल्ले. लोक मरत असताना असे वागणाऱ्या लोकांबाबत आम्ही ठरवले आहे, ‘हम छोडेंगे नही’ असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनावले.

शिंदे म्हणाले...  २५ वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता असताना मुंबईकरांसाठी यांनी केले काय? मूळ मुंबईकर बाहेर फेकला गेला. दर पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीवर साडेतीन हजार रुपये खर्च दाखवायचे. आता आम्ही सर्व रस्ते अडीच वर्षांत सिमेंटचे करून मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत.   मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार तर नाहीच पण आम्ही मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणू. ज्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे ते मुंबई तोडणार म्हणत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

फडणवीस म्हणाले...  मुंबईसह राज्यातील जनतेचा बुद्धिभेद करणे सुरू आहे. काही कॅमेराजीवी माणसे बोलत सुटली आहेत. एकदाच सांगतो कोणाच्या बापाच्या बापाचा बापही मुंबई आमच्यापासून तोडू शकत नाही. मुंबई तोडणार असे बरळून इथल्या विकासाला विरोध केला जात आहे.   मुंबईच्या आर्थिक गुंतवणुकीच्या योजनेला विरोध करणारे लोक महाराष्ट्रद्रोही आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारमार्फत मुंबईच्या विकासाची घोडदौड सुरू झाली आहे. मुंबईकरांमध्ये भय निर्माण करायचे आणि त्याच्या भरवश्यावर राजकारण करायचे हेच चालले आहे पण त्यावर आता लोक विश्वास ठेवणार नाहीत.

चंद्र, सूर्य आहेत, तोवर मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाचा बापही तोडू शकणार नाही. राजकीय स्वार्थासाठी काही लोक निराधार टीका करत आहेत. या आधीही खूप वेळा अशीच दिशाभूल करून झाली आहे.- अजित पवार, उपमुख्यमंत्री

टॅग्स :एकनाथ शिंदेअजित पवारदेवेंद्र फडणवीस