मुंबई - राज्य सरकारचं अधिवेशन आता शेवटच्या आठवड्यात असून आज संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरुन सभागृहात गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस आमदारांनी संभाजी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली. महात्मा गांधींबद्दल संभाजी भिडेंनी आक्षेपार्ह विधान केलं आह, त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही देण्यात आली आहे. मात्र, आता त्यांच्या समर्थकांकडून धमक्या येत असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत सांगितलं. त्यावर, उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली जाईल, माझा सख्खा भाऊ असला तरीही कारवाई होणारच, असे म्हटले.
तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत मनोहर भिडेंच्या विधानाचा संदर्भ देत, आपणास ट्विटरवरुन धमकी आल्याचं त्यांनी सांगितलं. मी माझ्या मतदारसंघात मनोहर भिडेंच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. कारण, महात्मा गांधींजींबद्दल त्यांनी अपशब्द वापरले होते. मला धमकी देणारा माणूस कैलाश सूर्यवंशी नावाचा असून तो धारकरी असल्याचं स्पष्टपणे सांगत आहे. त्यावरुन, उद्या माझ्या जीवाला काही झालं, तर जबाबदार कोण? असा सवालही यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत विचारला. त्यावर, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
यशोमती ठाकूर यांना पूर्णपणे सुरक्षा देण्यात येईल आणि ज्यांनी धमकी दिलीय, त्यास तुरुंगात टाकण्यात येईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. तर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही लक्षवेधी मांडताना, संभाजी भिडेंना गुरुजी म्हणण्यावरुन आक्षेप घेतला. त्यावर, त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे, आता यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे, मग बाबा कसं आलं, ह्याचा मी पुरावा मागू का? असा प्रतिसवालही त्यांनी विचारला. तसेच, या देशातील कुठल्याही महापुरुषाचा अवमान आम्ही सहन करणार नाही. मग, कोणीही असो, माझा सख्खा भाऊ का असेना, कारवाई होणारच, असेही फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.