Join us

डासांनी फोडून काढले तरी चालेल; पण रात्री एसटी सोडायची नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2023 10:50 AM

सुविधांअभावी चालक, वाहकांना सहन करावा लागतोय त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी ही आजही प्रवाशांना आपलीशी वाटते. रात्री वस्तीच्या ठिकाणी राहण्यासाठी असुविधा मिळत असल्याने चालक, वाहकांचे हाल होतात. काही गावांमध्ये झोपण्याची सुविधा नसल्याने गाडीतच झोपावे लागते. या गाड्यांमध्ये चालक, वाहकांना डास फोडून काढतात. मुंबईतून ग्रामीण भागात जाणाऱ्या ६० गावांपैकी काही ठिकाणी सुविधांची वानवा आहे. मुक्कामी जाणाऱ्या गाड्यांपैकी केळवणी, वाशिवली, आपटा, वडगाव, वेळास उटंबर, पांगरी, दंडनगरी यांसारख्या अनेक गावांत सुविधा नाहीत.

राज्य परिवहन महामंडळ आजही अहोरात्र प्रवाशांना योग्य सुविधा देत आहेत. यासाठी चालक, वाहक हे प्रामाणिकपणे काम करत आहेत. एसटी बस ही गावागावात शेवटच्या ठिकाणापर्यंत प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी सोडण्याची सुविधा देते. चालक, वाहक हे खेडेगावात शेवटची बस घेऊन त्याठिकाणी रात्रीचा मुक्काम करतात.  शेवटच्या स्थानकावर रात्रीच्या वस्तीला गेलेल्या चालक, वाहकाला वस्तीच्या ठिकाणी बस सोडून दुसरीकडे जाऊन आराम करण्याची सुविधा मिळत नाही. त्यामुळे चालक, वाहकाला एसटीमध्ये आराम करावा लागतो. बसमध्ये झोपत असले तरी डासांचा त्रास, बिनापंखा अशात त्यांना रात्र काढावी लागते. स्वच्छतागृह नसल्याने चालक, वाहकांना उघड्यावर जावे लागते. आंघोळीची सोय नसल्याने कर्मचाऱ्याला ड्यूटी संपेपर्यंत तसेच काम करावे लागते.

स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे- एसटी बस ज्या गावात रात्री वस्तीला असते त्या ग्रामपंचायत प्रशासनाने चालक, वाहकांची राहण्याची सोय करणे गरजेचे असते; पण त्याकडे दुर्लक्ष होत असून या असुविधेकडे एसटी तसेच स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

मुंबई विभागातील आगारांतून ७० बस रात्री वस्तीसाठी जातात. यापैकी काही गावांत स्वच्छतागृहाची सुविधा नाही. डासांचा त्रास असतो. काही ठिकाणी तिकीट मशीनच्या चार्जिंगची व्यवस्था नसते असे एका एसटी कर्मचाऱ्याने सांगितले.

कित्येक ठिकाणी मुक्कामी असणाऱ्या चालक, वाहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. खरेतर ग्रामपंचायतींनी लालपरीच्या सेवकांना मुक्कामाची व्यवस्था करून देणे आवश्यक आहे; परंतु, अनेकवेळा या लोकांची चांगली व्यवस्था केली जात नाही, हे दुर्दैव आहे. -संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

 

टॅग्स :मुंबईएसटी