भरती होऊनही लॅबतंत्रज्ञांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 02:26 AM2017-08-19T02:26:07+5:302017-08-19T02:26:09+5:30
महापालिकेची काही रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लॅब तंत्रज्ञाची भरती होऊनही पदे ‘रिक्तच’ असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले
स्नेहा मोरे।
मुंबई : महापालिकेची काही रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लॅब तंत्रज्ञाची भरती होऊनही पदे ‘रिक्तच’ असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. रुग्णालये,दवाखाने, प्रसूतिगृह आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मिळून एकूण १२ ठिकाणी एकही लॅब तंत्रज्ञ नसल्याचेही उघड झाले आहे. तसेच, लॅब तंत्रज्ञांची एकूण ४८ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे.
ऐन पावसाळ््यात साथींच्या आजारांनी डोकेवर काढलेले असताना पालिकेच्या आरोग्य विभाग यंत्रणाची अशी ढासळलेली यंत्रणा रुग्णांचे आरोग्य धोक्यात घालणारी आहे. या माहिती अधिकारानुसार, डिसेंबर २०१६ मध्ये १४८ लॅब तंत्रज्ञांची भरती करण्यात आली असून तरीही मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे.
पालिकेच्या आर/दक्षिण, रे रोड प्रसूतिगृह, एच पूर्व विभागातील कोळे कल्याणनगर आरोग्य केंद्र, के पश्चिम विभागातील बनाना लिफ दवाखाना, के पश्चिम विभागातील मिल्लतनगर दवाखाना, एन विभागातील नाथ पै गरोडीयानगर येथील दवाखाना, आर दक्षिण विभागातील संभाजीनगर, आर उत्तर विभागातील आनंदनगर, आर एन विभागातील शास्त्रीनगर, एल विभागातील हिमालया कॉ.आॅ.सो नारी सेवा सदन येथील आरोग्य केंद्र, एम पूर्व येथील लल्लूभाई कंपाऊंडमधील आरोग्य केंद्र, जोगेश्वरी येथील राममंदिर रोड येथील आरोग्य केंद्र आणि नाहूर पूर्व येथील आरोग्य केंद्रांमध्ये लॅब तंत्रज्ञच नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
>योग्य निदानासाठी लॅबतंत्रज्ञ आणि पॅथालॉजिस्ट आवश्यक
शहर-उपनगरात एका बाजूला बोगस पॅथालॉजिस्टचा सुळसुळाट आहे, तर दुसरीकडे लॅबतंत्रज्ञांची अशी पदे रिक्त असणे म्हणजे सामान्यांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. महापालिका क्षेत्रात साथीचे रोग वाढल्यामुळे यंत्रणांवरील ताण वाढला आहे, अशा परिस्थितीत रुग्णांच्या योग्य निदानासाठी पॅथालॉजिस्ट आणि लॅबतंत्रज्ञ असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणांनी याकडे त्वरित लक्ष देऊन कार्यवाही करावी.
- प्रसाद कुलकर्णी , कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथालॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट,