Join us

उमेदवारी जाहीर झाली नसली तरी मतदार मोदींच्या छबीकडे पाहून मतदान करतील: दिनेश शर्मा

By रेश्मा शिवडेकर | Published: April 26, 2024 8:54 PM

येत्या दोन दिवसांत मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांची घोषणा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

रेश्मा शिवडेकर,  लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महायुतीने मुंबईत अजूनही तीन ठिकाणी उमेदवार दिला नसला त्याने काही फरक पडत नाही. मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी पाहून मतदान करतात, असा विश्वास उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार दिनेश शर्मा यांनी व्यक्त केला. येत्या दोन दिवसांत मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांची घोषणा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांच्या प्रचारासाठी ते कांदिवलीत आले होते. मतदारसंघातील उत्तर भारतीय बहुल भागात त्यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, मुंबईतील उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने भाजपला मतदान करण्याकरिता रस्त्यावर उतरेल, असा विश्वास व्यक्त केला.

मुंबईत मतदानाच्या दिवशी उत्तर भारतीयांनी गावी न जाता येथे थांबून मतदान करावे, या दृष्टीने आम्ही नियोजन केले आहे, अशी माहिती शर्मा यांनी दिली.महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) भाजपाला मनापासून साथ देत आहे. त्यांची साथ भाजपला लाभल्याने आमचा उत्तर भारतीय मतदार दुखावण्याची शक्यता नाही, असा विश्वास शर्मा यांनी वर्तवला.

महाराष्ट्रात राहणारे सर्व महाराष्ट्रीय आहेत. त्यामुळे मराठी-गुजराती, मराठी-उत्तर भारतीय हे वाद अनाठायी आहेत. इथले उमेदवार गोयल यांनीही कधी जाती-धर्माच्या वादाला खतपाणी घातलेले नाही.  - दिनेश शर्मा

टॅग्स :भाजपामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४