लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुलीचा बुद्ध्यांक कमी असला तरी तिला आई होण्याचा अधिकार नाही का, असा सवाल करत उच्च न्यायालयाने दत्तक पालकांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली आहे.
मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसलेल्या २७ वर्षीय अविवाहित मुलीची २१ आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर बुधवारी न्या. रवींद्र घुगे आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. संबंधित मुलगी मानसिकदृष्ट्या अक्षम किंवा अस्वस्थ नसल्याचे जे. जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात स्पष्टपणे म्हटले असल्याची दखल न्यायालयाने घेतली.
मुलीची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा थोडी कमी आहे. आपण सर्व मनुष्य आहोत. प्रत्येकाची बुद्धिमता वेगवेगळी आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. कमी बुद्ध्यांक असलेली मुलगी आई होऊ शकत नाही, असे आम्ही म्हटले तर ते कायद्याशी विसंगत ठरेल. तिला मानसिक आजारी ठरविण्यात आलेले नाही. तिचा बुद्धयांक सरासरीपेक्षा कमी आहे, असे न्यायालयाने म्हटले.
विवाहाबाबत चाचपणीची सूचना
- मुलीने तिचे कोणाबरोबर प्रेमसंबंध आहेत, याची माहिती पालकांना दिल्याचे वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
- त्यावर न्यायालयाने पालकांना पुढाकार घेऊन संबंधित व्यक्तीशी चर्चा करण्यास सांगितले. ती व्यक्ती मुलीशी विवाह करण्यास तयार आहे का? हे पाहा. दोघेही सज्ञान आहेत.
- त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही. मुलगी सहा महिन्यांची असताना त्यांनी तिला दत्तक घेतले. त्यामुळे पालकांचे कर्तव्य त्यांना पार पाडावे लागेल, असे म्हणत न्यायालयाने पुढील सुनावणी १३ जानेवारी रोजी ठेवली आहे.