मोटरमनने जांभई दिली तरी मिळणार मुख्यालयाला अलर्ट
By नितीन जगताप | Published: September 26, 2023 06:11 AM2023-09-26T06:11:09+5:302023-09-26T06:11:31+5:30
एआय प्रणालीच्या कॅमेऱ्याची असणार करडी नजर
नितीन जगताप
मुंबई : लाल सिग्नल ओलांडून गाडी पुढे जाणे, वेग मर्यादेचे उल्लंघन होणे, स्थानकातील थांबाच विसरणे इत्यादी मानवी चुकांमुळे अनेकदा लोकलचा अपघात होण्याची शक्यता असते. अशा घटनांमागील नेमक्या कारणांचा शोध घेता यावा, पुरावे मिळावेत यासाठी लोकलच्या मोटरमन आणि गार्डच्या केबिनच्या आत-बाहेर एआय प्रणालीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवर प्रायोगिक तत्त्वावर असे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे मोटरमनने जांभई दिली तरी मुख्यालयाला त्याचा अलर्ट मिळू शकणार आहे.
उपनगरीय गाड्यांच्या वाहतुकीची वारंवारता पाहता सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळेच केबिनमध्ये मोटरमनच्या हालचाली न्याहाळता याव्यात, त्यांच्यावर लक्ष ठेवता यावे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने त्याचे पुरावे मिळावेत या उद्देशाने तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पहिला कॅमेरा मोटरमनच्या चेहऱ्यावरील भाव टिपणारा असेल. तर, दुसऱ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण केबिन कव्हर होणार आहे. तिसरा कॅमेरा पुढील भागात लावलेला असेल. त्यामुळे ट्रॅक आणि ओव्हरहेड वायरवर लक्ष देणे सोपे होईल. यामुळे मोटरमनच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवले जाणार आहे.
मोटरमनचे लक्ष विचलित होणे, त्याला थकवा येणे, त्याच्याकडून मोबाइलचा वापर होणे, धूम्रपान करणे, जांभई येणे याबाबत अलर्ट मिळणार आहे. एआय प्रणालीप्रणीत कॅमेरा पद्धती मोटरमनच्या हिताचीच आहे.
- डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क
अधिकारी, मध्य रेल्वे
तूर्तास आंदोलन नाही
मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यास मोटरमननी विरोध दर्शवला आहे. सोमवारी यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात मोटरमन आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची बैठक झाली. मात्र, मध्य रेल्वेने मोटरमन आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी मागितला आहे. तोपर्यंत मोटरमननी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेने मोटरमनला केल्याची माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने दिली आहे.
एआय प्रणालीचा वापर
कॅमेरा पद्धतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर केला जाणार आहे. या माध्यमातून यंत्रणा मोटरमनला कर्तव्य बजावत असताना मोटरमनचे लक्ष विचलित झाल्यास, त्याला डुलकी लागल्यास सतर्क करणार आहे.
डुलकी अवस्थेसाठी लवकर चेतावणी देण्यास, अचानक
झोप लागल्यास शोधण्यात तसेच मोटरमनद्वारे मोबाइल फोनचा वापर करत असल्यास माहिती मिळणार आहे. तसेच, ऑनलाइन रिमोट मॉनिटरिंग मोटरमनसोबत टू वे टॉक सर्व्हरद्वारे शक्य होणार आहे.