राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्षातील आमदार अपात्रतेचा खरा निकाल उद्या बुधवारी लागणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनाच निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे सांगत, त्यांच्याकडे हे प्रकरण सोपवले. त्यामुळे, गेल्या ५ महिन्यांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित प्रकरणातील दोन्ही बाजुंवरील सुनावणी घेतली. त्यानंतर, आता हे प्रकरण निर्णयावर येऊन ठेवलं आहे. त्यामुळे, निर्णय कोणाच्या बाजुने लागणार, निर्णयानंतर सरकारला काही फरक पडणार का, शिंदे सरकार राहणार की जाणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यावरुन, दोन्ही गटाचे समर्थक आमदार व पदाधिकारीही भूमिका मांडत आहेत.
आमदार अपात्र करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकांवर निकाल देण्यापूर्वी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संताप व्यक्त करत गंभीर आरोप केले. या आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण देत मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागील कारण सांगितलं आहे. तर, नार्वेकरांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यामुळे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे, ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर उद्याच्या निकालावरुन भाकीतं करत आहेत. त्यात, आमदार अपात्र ठरल्यानंतर सरकार कोसळणार, मुख्यमंत्री शिंदेंचं पद जाणार, असंही ठाकरे गटातील काही नेत्यांकडून म्हटलं जात. त्यावर, आता शिंदे गटाच्या आमदाराने प्रतिक्रिया दिली आहे.
निकाल विरोधात आला तरी, सरकारला काहीचं फरक पडणार नाही. कारण, निकाल विरोधात आल्यास आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे. विरोधकांनी थोडं थांबावं आणि निकालाची वाट बघावी, असे शिंदे गटासोबत असलेले भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटलं. तसेच, वेट अँड वॉच असे म्हणत विरोधकांना टोलाही लगावला.
निकालाचा सरकारला काहीच फरक पडत नाही. हे जे होतंय, ते फक्त प्रेशर बनविण्याचं काम सुरू आहे, बाकी काही नाही. सरकारमधील २१० पैकी १६ आमदार अपात्र जरी झाले, तरी सरकारमध्ये काहीचं फरक पडत नाही. याशिवाय अपात्र झाल्यास कोर्टात दाद मागता येईल, अशी आशा आहे, असेही भोंडेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे, या निकालामुळे खरंच सरकार जाणार की नाही, यावर अद्यापही तर्कवितर्कच लावले जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, आमचं सरकार स्थीर राहिल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येणाऱ्या निकालावर दिली आहे.