मुख्यमंत्री : विराेधकांना लगावला टाेला, रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाहन चालविताना आणि सरकार चालविताना स्पीडब्रेकर येतात. मी कार आणि सरकार दोन्ही चालवतो, रस्त्यावर खड्डे, स्पीडब्रेकर आले तरी कार आणि सरकारची पकड ढिली होऊ देणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला. सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येते रस्ता सुरक्षा अभियानाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, रस्ते फक्त माणसेच क्रॉस करत नाहीत तर प्राणीही करतात. त्यांचीही काळजी घ्यायला हवी. पाश्चिमात्य देशात गाडीखाली येऊन बेडूक मरू नये म्हणून जाळी लावतात. नवीन तंत्रज्ञान, नवीन वेगाच्या गाड्या येत आहेत. त्या दृष्टीने माहिती देणे आणि जनजागृती करणे गरजेचे आहे. रस्ते नियम पळताना ज्या सोयी-सुविधा असतात त्यात सहजता हवी. त्याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे.
१२ ते १३ वर्षांच्या मुलांनी रस्ते सुरक्षा चित्र आणि स्लोगन तयार केलेल्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. त्यांच्या हस्ते अपघात कमी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात मुंबई, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता.
यावेळी परिवहनमंत्री ॲड. अनिल परब, मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.
* ‘नियम, संयम न पाळल्यास यम भेटीला येतो’
रस्ते सुरक्षा हा सप्ताह किंवा महिनाभरापुरता मर्यादित न राहता नियमितपणे जनजागृती व्हावी. नियम आणि संयम या दोन्ही शब्दांत यम आहे. जर तुम्ही वाहन चालविताना नियम आणि संयम पाळला नाही तर यम भेटीला येतो जो आपला जीव घेऊन जातो. त्यामुळे यमाला टाळायचे असेल तर नियम आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
* हेल्मेट आणि सीटबेल्ट जीवनशैलीचा भाग व्हावा
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वजण मास्क वापरतात. मास्क हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियम, शिस्त यांचे पालन करणे आवश्यक आहे. अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी हेल्मेट आणि सीटबेल्ट जीवनशैलीचा भाग व्हावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
.................................