मनीषा म्हात्रेमुंबई :
नियंत्रण कक्षात दर मिनिटाला खणखणणाऱ्या कॉलमध्ये एका व्यक्तीच्या सततच्या अश्लील कॉलची खणखण वाढल्याने महिला पोलिस वैतागल्या होत्या. कॉलची छाननीही झाली. मात्र, सिमकार्ड नसलेल्या मोबाईलवरून हा काॅल येत असल्याने आरोपीचा शोध लागेना. तीन वर्षांत आरोपीचे तब्बल १० हजार ३०० अश्लील कॉल नियंत्रण कक्षात धडकले होते. अखेर, तीन वर्षांच्या अथक तपासानंतर गुन्हे शाखेच्या पथकाला या अज्ञात काॅलधारकाचा शोध घेण्यात यश आले आहे.
गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद काठे यांच्या नेतृत्वातील पथकाने या फोनधारकाचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेने कुरारमधून काॅलधारक २२ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. मात्र, हा मुलगा गतिमंद असल्याचे समोर आल्याने पोलिसांना त्याला नोटीस देऊन सोडून द्यावे लागले. हा मुलगा २०२० पासून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कॉल करून महिला पोलिसांशी अश्लील संवाद साधत होता.
गेल्या तीन वर्षांत आरोपीने तब्बल १० हजार ३०० कॉल केले. गुन्हे शाखेने याच काॅलची छाननी करून तांत्रिक पुराव्याच्या मदतीने क्रमांकांची जुळवाजुळव करीत कुरारमधील मुलापर्यंत पोहोचले. मुलाच्या विक्षिप्त स्वभावामुळे आई-वडिलांनी त्याला साधा फोन वापरण्यास दिला होता. त्यात सिमकार्ड नव्हते. सिमकार्ड नसले तरी मोबाईलवरून पोलिसांच्या १०० क्रमांकावर कॉल लागत होता. याचाच फायदा घेत त्याच्याकडून अशाप्रकारे सतत कॉल करून अश्लील भाषेत बोलत असल्याचे तपासांत समोर आले.
असा घेतला शोध..९११ हा क्रमांक आणि पुढील आयएमआय क्रमांकातील ७ क्रमांक एकत्र आल्याने १० अंकी क्रमांक बनून सिमकार्ड नसतानाही कॉल लागत असल्याचे समोर येताच या गुन्ह्याची उकल करण्यास पोलिसांना यश आले. त्याचवरून पोलिस मुलाच्या आयएमआय क्रमांकावरून त्याच्यापर्यंत पोहोचले.