चुकीच्या ट्रेनने प्रवास केला तरी नुकसानभरपाई दिली जाऊ शकते- उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 04:20 AM2020-02-23T04:20:43+5:302020-02-23T04:21:24+5:30

रेल्वे लवादाने दिलेला आदेश केला रद्द

Even if traveling by the wrong train, you may be compensated | चुकीच्या ट्रेनने प्रवास केला तरी नुकसानभरपाई दिली जाऊ शकते- उच्च न्यायालय

चुकीच्या ट्रेनने प्रवास केला तरी नुकसानभरपाई दिली जाऊ शकते- उच्च न्यायालय

Next

मुंबई : बडनेरा या स्थानकावर उतरताना प्रवाशाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वारसदारांना आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मध्य रेल्वेला देत रेल्वे लवादाचा आदेश रद्द केला.

प्रवासी अर्जुन गावंडे यांनी चुकीच्या ट्रेनने प्रवास केला. संबंधित ट्रेन बडनेरा स्थानकावर थांबणार नाही, हे माहीत असूनही त्यांनी ती ट्रेन पकडली. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला तेच कारणीभूत आहेत, असे म्हणत रेल्वे लवादाने गावंडे यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यास नकार दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा हवाला देत उच्च न्यायालयाने म्हटले की, पीडित व्यक्तीने चुकीची ट्रेन पकडल्याने तो त्याच्या मृत्यूला जबाबदार आहे, हे रेल्वे लवादाचे निरीक्षण योग्य नाही.

गावंडे यांनी अकोला रेल्वे स्थानकावरून दोन तिकिटे काढली. एक तिकीट अकोला ते शेगाव व दुसरे अकोला ते मूर्तिजापूर, असे होते. ते बडनेरा स्थानकावर उतरत होते, तेव्हा त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला.

मध्य रेल्वेकडून नुकसानभरपाई मिळावी, यासाठी गावंडे कुटुंबीयांनी लवादात दाद मागितली. मात्र, पीडित व्यक्तीने दोन तिकिटे काढली होती. अकोला ते शेगाव व अकोला ते मूर्तिजापूर. पण त्यांनी भुवनेश्वर एक्स्प्रेसमधून प्रवास केला.

ही ट्रेन बडनेरा किंवा मूर्तिजापूर येथे थांबत नाही. पीडित व्यक्ती बडनेरा येथे उतरत होती आणि तेथे ट्रेन थांबत नाही. स्वत:च्याच निष्काळजीपणामुळे पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला, असे म्हणत लवादाने गावंडे कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यास नकार दिला. रेल्वे लवादाच्या या निर्णयाविरोधात गावंडे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

रेल्वेकडून नुकसानभरपाई देण्यास नकार देण्यात आला. पीडित स्वत:च त्याच्या मृत्यूस जबाबदार आहे, असे रेल्वेने न्यायालयाला सांगितले. तर पीडित व्यक्तीच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाने काही अशाच प्रकरणी दिलेल्या निकालाचा हवाला उच्च न्यायालयाला दिला.
‘अशाच प्रकारच्या एका केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, पीडित व्यक्ती त्याच्या निष्काळजीपणामुळे ट्रेनमधून उतरत असताना त्याचा मृत्यू झाला असला तरी ते काही गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य नव्हते. त्यामुळे रेल्वे आपले उत्तरदायित्व नाकारू शकत नाही,’ असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला.

प्रवाशाचा मृत्यू होणे दुर्दैवी
ट्रेनमध्ये चढताना व उतरताना प्रवाशाचा मृत्यू होणे दुर्दैवी आहे. त्याच्या निष्काळजीपणामुळे त्याचा जीव गेला, असे म्हणून नुकसानभरपाई देण्याचे रेल्वे टाळू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने एका केसच्या निकालात म्हटले आहे. सर्व निकाल विचारात घेऊन न्यायालयाने रेल्वे लवादाचा निकाल रद्द करत मध्य रेल्वेला गावंडे कुटुंबीयांना ८ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला.

Web Title: Even if traveling by the wrong train, you may be compensated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.