उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करू शकत नाहीत; किरीट सोमय्यांचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 01:55 PM2022-03-01T13:55:18+5:302022-03-01T13:56:02+5:30
ठाकरे सरकार आणि मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल करणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे.
मुंबई-
ठाकरे सरकार आणि मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल करणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्या कुटुंबीयांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलत असताना किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करू शकणार नाहीत, असं विधान केलं आहे.
"बाप बेटे जेल जाएंगे" असं म्हणत संजय राऊतांनी किरीट आणि नील सोमय्या यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरू केली आहे. त्यानंतर नील सोमय्यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठ याचिका दाखल केली. त्यावर आज निकाल येणार आहे. याच मुद्द्यावर बोलत असताना किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
"राज्यातील जनतेला काल कळलं की, नील सोमय्या निर्देष आहे. त्यांना मुंबई पोलिसांनी दोषी ठरवले नाही, त्यामुळं त्यांची बदली केली. संजय राऊत तुम्ही नौटंकीबाज आहात हे कबूल करा. कसला गेम बिगीन. ईडीने बंदूक दाखवली तो डेकोरेटर कुठे आहे?", असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.
पेड मीडिया एजन्सी सल्ला देत आहे. मोदी सरकार मागे लागलंय असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग, पोलीस कमिश्नरची हकालपट्टी का केली ते सांगा, असंही सोमय्या म्हणाले.
"उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी किरीट सोमय्यांवर कारवाई करू शकणार नाहीत. मेधा सोमय्या, नील सोमय्यांवर कारवाई करू शकणार नाहीत. कारण घोटाळे ऊद्धव ठाकरे करतात. जे डर्टी डझन घोषित केले आहेत, त्यांच्यावर कारवाई कधी होणार ते सांगा", असा सवाल त्यांनी केला. श्रीधर पाटणकर यांनी हवाला ऑपरेटकडून पैसा ट्रान्सफर केला, वरूण सरदेसाईचेही पुरावे समोर येतायत, असंही सोमय्या म्हणाले.