Join us

शाळा सुरू होऊन आठवडा उलटला, तरीही अभ्यासक्रम कपातीचा निर्णय होईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शाळा सुरू होऊन आठवडा उलटला तरी अद्याप शिक्षण विभागाकडून यंदाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील कपातीबाबत कोणतीच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शाळा सुरू होऊन आठवडा उलटला तरी अद्याप शिक्षण विभागाकडून यंदाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील कपातीबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. शिक्षण विभागाने अभ्यासक्रम कपातीची घोषणा केल्यास शिक्षक आणि मुख्याध्यापकांना त्याप्रमाणे अभ्यासक्रमाचा वार्षिक आराखडा तयार करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने अभ्यासक्रम कपातीचा निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी मुख्याध्यापक, शिक्षक करत आहेत.

ऑनलाइन अभ्यासामुळे आधीच एकीकडे दैनंदिन तासिकांच्या वेळेत घट झाल्याने आणि दुसरीकडे ब्रिज कोर्स पुढील १५ तारखेपर्यंत सुरू राहाणार असल्याने यंदाच्या अभ्यासक्रमाचे नियोजन कसे करायचे? तो वेळेत पूर्ण कसा करायचा, असे अनेक प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापकांकडून उपस्थित होत आहेत.

कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सने अर्थात आयसीएसई आणि आयएससीने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अभ्यासक्रम कपात केली आहे. याचबरोबर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची मूल्यमापन पद्धत जाहीर करत अभ्यासक्रम दोन सत्रांमध्ये विभागला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही दहावी व बारावीच्या अभ्यासक्रम आणि मूल्यमापन आराखडा वेळेत जाहीर करावा, म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास आणि शिक्षकांना अध्यापन करणे सुलभ होईल, अशी मागणी शिक्षक व मुख्याध्यापक करत आहेत.

दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम हे वेळेत शिकवून पूर्ण होणे आवश्यक आहे. जो भाग वगळण्यात येणार आहे, त्याची माहिती लवकर झाल्यास शिक्षकांना सराव परीक्षा आणि मूल्यमापनासाठीच्या चाचण्या या सगळ्याच बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने नियोजन करणे सोपे होईल, असे मत शिक्षक व्यक्त करीत आहेत.

विद्यार्थी, पालक यांच्यावरील ताण लक्षात घेत यंदाही राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या अभ्यासक्रम कपातीचा विचार करावा. राज्य शिक्षण मंडळाने अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीबाबत वेळीच मार्गदर्शन करावे.

पांडुरंग केंगार, सचिव, मुख्याध्यापक संघटना, मुंबई