पाच वर्षे सत्ता सांभाळूनही मुख्यमंत्रिपद मिळत नसेल तर मग कधी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 03:26 AM2019-11-01T03:26:22+5:302019-11-01T06:32:19+5:30

शिवसेनेत टोकाची अस्वस्थता : पक्षपातळीवर अन्य समीकरणांचा विचार सुरू

Even if you do not get the CM for five years, then when will you get it? | पाच वर्षे सत्ता सांभाळूनही मुख्यमंत्रिपद मिळत नसेल तर मग कधी मिळणार?

पाच वर्षे सत्ता सांभाळूनही मुख्यमंत्रिपद मिळत नसेल तर मग कधी मिळणार?

Next

अतुल कुलकर्णी 

मुंबई : भाजपने सातत्याने दिलेली सापत्न वागणूक, मुख्यमंत्रिपद मिळणार नाही असे स्पष्ट शब्दात जाहीरपणे सांगणे, प्रयत्न करूनही शिवसेनेला २०१४ एवढे आमदार निवडून आणता न येणे, प्रशांत किशोर यांची रणनिती पूर्णपणे अयशस्वी ठरणे आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आणखी पाच वर्षे पूर्ण होणार नाही या सगळ्यांमुळे शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अत्यंत संतप्त आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर अन्य पक्षातील विजयी होणारे नेते शिवसेनेत आणले, पण ते पराभूत झाले. अनेक मतदारसंघात उमेदवारांना सगळ्या प्रकारची मदत केली, रणनितीकार प्रशांत किशोर यांचे सल्ले कामी आले नाहीत. वरळीत सगळे काही शिवसेनेच्या बाजूने असताना आदित्य ठाकरे यांना प्रचंड बहुमत मिळेल असे वाटत होते, ते ही झाले नाही. अशी सगळी नकार घंटा असताना मुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्षाचे असेल असे ठरलेच नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आणि सगळ्या नाराजीचा स्फोट मातोश्रीवर झाला.

अनेक मतदारसंघात भाजपने त्यांच्या लोकांना बंडखोरी करायला लावली. त्यामुळे अनेक जागी शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे नाही पण, भाजपमुळे पराभव पत्करावा लागला, अशी माहिती अनेक नेत्यांनी ठाकरे यांना दिली. पाच वर्षे सत्ता असताना कायम भाजपचे सरकार असा उल्लेख भाजपकडून केला गेला आणि आता त्यांना आमची गरज पडल्यावर ते सतत युतीचे सरकार असा उल्लेख करत आहेत. हे न समजण्याएवढे आम्ही खुळे नाहीत, अशा शब्दात सेनेच्या नेत्याने आपली व्यथा बोलून दाखवली.

आदित्य ठाकरे तरूण आहेत, त्यांना मंत्री करुन भाजपचे नेते त्यांनाही उद्या अडचणीत आणतील आणि त्यांचाही एकनाथ खडसे किंवा विनोद तावडे करतील, असे त्यांना वाटत असेल तर शिवसेना काही त्यांच्यासारखी गप्प बसणारी नाही, असेही तो नेता म्हणाला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे भाजपसोबतचे संबंध तणावाचे झाले आहेत. भाजपने महसूल आणि गृह ही दोन खाती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी समसमान वाटप केले जाईल, हे भाजप नेत्यांचे आश्वासन हवेत विरले आहे. पाच वर्षे सत्ता असताना जर शिवसेना वाढू शकत नसेल, त्यांना त्यांचा मुख्यमंत्री करता येत नसेल तर मग अशी संधी कधी मिळणार? या एकाच विचाराने शिवसेनेत टोकाचा असंतोष आहे. मात्र तो कसा बाहेर येणार हे स्पष्ट होत नाही.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असे सरकारही बनू शकेल का? याचीही चाचपणी चालू झाली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस यात नेमकी कोणती भूमिका घेणार? की ऐनवेळी राष्ट्रवादीच भाजप सोबत जाईल याविषयी शिवसेना नेत्यांना कोणतीही खात्री वाटत नाही.

उद्धव ठाकरेंचे नाव बाजूला पडल्याचीही नाराजी
भाजपचा मुख्यमंत्रीपद देण्यास नकार आल्याने शिवसेनेत दुहेरी खदखद आहे. मुळात आदित्य ठाकरे यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी पुढे केले गेल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव आपोआप मागे पडले. वास्तविक मुख्यमंत्रिपदासाठी आमच्याकडून उद्धव ठाकरे यांचे नाव होते, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतली नाही. त्यामुळे ठाकरे नाराज झाल्याचे चित्र आहे. पण नाराजी दाखवावी तर मुलाचे नाव पुढे केले गेले आहे आणि गप्प रहावे तर आपले नाव मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहे, अशी त्यांची अवस्था झाल्याचे त्यांच्या जवळचे लोक सांगत आहेत.

Web Title: Even if you do not get the CM for five years, then when will you get it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.