रिझर्व्हेशन नाही मिळाले तरी करा प्रवास बिनधास्त; एक्स्प्रेस गाड्यांना जोडले २६७ जनरल डबे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 10:18 IST2024-12-13T10:17:58+5:302024-12-13T10:18:06+5:30
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मेल/एक्स्प्रेसमध्ये या डब्यांची जोडणी सुरू असून, या आर्थिक वर्षात ९०० डबे आधीच जोडले गेले आहेत.

रिझर्व्हेशन नाही मिळाले तरी करा प्रवास बिनधास्त; एक्स्प्रेस गाड्यांना जोडले २६७ जनरल डबे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सामान्य द्वितीय श्रेणीच्या डब्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने त्यांच्या मेल/एक्स्प्रेस गाड्यांना एकूण २६७ जनरल डबे जोडले आहेत. या डब्यांच्या माध्यमातून हजारो अनारक्षित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी संगितले.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मेल/एक्स्प्रेसमध्ये या डब्यांची जोडणी सुरू असून, या आर्थिक वर्षात ९०० डबे आधीच जोडले गेले आहेत. ७९ रेकसह ३७ जोड्या मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ११७ अतिरिक्त जनरल डबे जोडण्यात आले आहेत. यामुळे दररोज १० हजारांहून अधिक प्रवाशांना फायदा होत आहे. सामान्य डब्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, भारतीय रेल्वेने १२ हजार जनरल डबे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवून एक विशेष उत्पादन उपक्रम सुरू केला आहे. यापैकी सुमारे दोन हजार डबे तयार झाले असून, येत्या काळात आणखी १० हजार उत्पादन करण्याचे लक्ष्य आहे.
अधिक सुलभता
nअतिरिक्त जनरल डब्यांच्या उपलब्धतेमुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे.
nअनेक वेळा तिकीट न मिळाल्यामुळे प्रवासाला मुकावे लागणाऱ्या प्रवाशांना आता अधिक सुविधा मिळतील. याशिवाय, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अनारक्षित प्रवास सुलभ आणि सोयीस्कर होईल.