"दारूपासून उत्पन्न मिळाले तरी ती घात करेल"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 06:43 AM2020-05-20T06:43:43+5:302020-05-20T06:44:09+5:30

राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना महसुलासाठी वाईन शॉप सुरू केले पाहिजेत, ही मागणी प्रथमदर्शनी योग्य वाटत असली तरी त्याचे दुष्परिणाम हे भयंकर होण्याची शक्यता आहेत.

"Even if you get income from alcohol, it will hurt." | "दारूपासून उत्पन्न मिळाले तरी ती घात करेल"

"दारूपासून उत्पन्न मिळाले तरी ती घात करेल"

Next

मुंबई : आज हाताला काम नसताना गरीब कुटुंबातील महिला उरलेले पैसे जपून वापरत संसार चालवत आहेत. अशा स्थितीत दारू घरपोच उपलब्ध झाली तर व्यसनी पुरुष ती बचत संपवून टाकतील. प्रसंगी घरातील धान्य विकून दारू पितील. महिला अत्याचारांचे प्रमाण त्यातून वाढेल. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना महसुलासाठी वाईन शॉप सुरू केले पाहिजेत, ही मागणी प्रथमदर्शनी योग्य वाटत असली तरी त्याचे दुष्परिणाम हे भयंकर होण्याची शक्यता आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका सर्वेक्षणानुसार जर दारूपासून १० रुपये उत्पन्न मिळत असेल तर त्याचे जे समाजात होणारे जे दुष्परिणाम आहेत ते दहापट असतात, म्हणजेच १०० रुपये होत असतात. त्यामुळे याबाबत पुन्हा एकदा विचार करावा, असे म्हणणे नशाबंदी मंडळाने राज्य सरकारकडे मांडले आहे.
ई-टोकन देऊन घरपोच दारू उपलब्ध करून सरकार निश्चित सोशल डिस्टन्सिंग यशस्वी करू शकेल. मात्र याचे परिणाम भविष्यासाठी अतिशय घातक होतील. कुठल्याही व्यसनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होत असते. जागतिक आरोग्य संघटनेने व्यसनाला विरोध केलेला आहे आणि कुठलेही व्यसन हे अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसताना दारूबंदी उठवणे दुष्परिणामकारक ठरेल, असे आमचे मत आहे. त्याचप्रमाणे दारू दुकाने बंद ठेवल्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला मोठ्या प्रमाणाला आळा बसलेला आहे. त्याचप्रमाणे दारूवर खर्च होणारा पैसा कुटुंबाच्या भरणपोषणासाठी खर्च झाल्यामुळे भुकेचा उद्रेकही काही प्रमाणात कमी झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. यातून अनेक व्यसनाधीन व्यक्ती कायमच्या निर्व्यसनी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, जी की अत्यंत समाधानाची बाब आहे. मध्यंतरी दारूची दुकाने सुरू करण्यात आली होती, परंतु सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

दारू घरपोच उपलब्ध करून त्याचे होणारे दुष्परिणाम महसूल मिळकतीपेक्षाही जास्त असतील. राज्य शासन व्यसनाच्या व्यापारातून राज्य चालवते ही बाब सभ्य, सुसंस्कृत व प्रगतशील समाजासाठी योग्य नाही. दारूच्या महसुलावर जोपर्यंत आपण अवलंबून असू तोपर्यंत आपण सर्वांगीण विकास साध्य करू शकत नाही.
- वर्षा विद्या विलास,
सरचिटणीस, नशाबंदी,
महाराष्ट्र राज्य

शासनाने दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. बिहार राज्याने दारूबंदी करून व्यसनमुक्त समाजनिर्मितीच्या दिशेने एक क्रांतिकरी पाऊल उचलले आहे. ज्याचे सकारात्मक परिणाम बिहारमध्ये दिसून येत आहेत. आपण व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सकारात्मक पाऊल उचलून महाराष्ट्राचा गौरव वाढवावा.
- अमोल मडामे,
मुख्य संघटक, नशाबंदी, महाराष्ट्र राज्य

Web Title: "Even if you get income from alcohol, it will hurt."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई