"एकच काय १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी.."; राज ठाकरेंवर भाजपाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 04:32 PM2024-03-10T16:32:07+5:302024-03-10T16:33:21+5:30
राज ठाकरेंच्या भाषणातील टीकेला भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सर्वच राजकीय पक्षांना ठाकरे स्टाईल सुनावले. राज यांनी सत्ताधारी महायुतीसह विरोधकांच्या महाविकास आघाडीवरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी, पक्षांतर किंवा फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना, मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, सध्या राजकारणात दुसऱ्याची पोर कडेवर घेऊन खेळवताय, असे राज यांनी म्हटले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचीही आठवण करून दिली आहे. आता, भाजपाकडूनराज ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
राज ठाकरेंच्या भाषणातील टीकेला भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ''आमचं पितृतुल्य नेतृत्त्व असणारे नरेंद्र मोदी यांना कोणाला कडेवर घ्यायचं, कोणाला गोंजारायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. देशाच्या भल्यासाठी एकच काय, १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी राष्ट्र सर्वोतोपरी मानणारा आमचा पक्ष आहे. आम्हाला मुलं आमची, तुमची यापेक्षा देश महत्त्वाचा आहे. देशहितासाठी आणखी १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी चांगली पोरं भाजपा घेईल, आणि जे पोरं ख्वॉड असतील त्यांना दुरुस्त करण्याची क्षमती आणि धमक भाजपात आहे,'' असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
शिवस्मारकावरी टीकेलाही उत्तर
शिवस्मारक होणार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होत आहे, त्याला देवेंद्र फडणवीस यांनीच मूर्त स्वरुप आणलं. ते मुख्यमंत्री असतानाच सगळ्या परवानग्या आणल्या. त्याचप्रमाणे शिवस्मारकही होणार, शिवछत्रपतींचा पुतळाही होणार. कारण, शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे, कोणी म्हणतं म्हणून नाही. तर, आमचं ते वचन आणि उद्दिष्टय आहे, ते आम्ही पूर्ण करणारच, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले.
काय म्हणाले होते राज ठाकरे
गेल्या १८ अनेक चढ उतार आले आहेत. या चढउतारात आपण माझ्यासोबत हे समाधान आहे. यश हे मी तुम्हाला मिळवून देणार हा माझा शब्द आहे. मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, सध्या राजकारणात दुसऱ्याची पोर कडेवर घेऊन खेळवताय. पण माझ्या खांद्यावर माझी पोरं खेळवण्याची ताकद माझ्यात आहे, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. नाशिक येथे मनसेचा १८ वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.
मनसे-भाजपा यांच्यात फारसं अंतर नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेने जी काही व्यापक भूमिका घेतली आहे ती आमच्या विचारांशी विसंगत नाही. क्षेत्रीय अस्मिता ही आम्हाला मान्यच आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसांबद्दल बोलणे हे योग्यच आहे. मराठी माणसांच्या हक्कासोबत त्यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे त्यामुळे मनसे-भाजपा यांच्यात फारसं अंतर राहिलेले नाही. बाकी निवडणुकीत काय होईल हे सांगता येत नाही. जे काही आहे चर्चेवर होईल. योग्य वेळी योग्य गोष्टी होत असतात असं त्यांनी म्हटलं आहे.