Join us

२१ व्या शतकातही महिलांची मासिक पाळीवरून छळवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 10:40 AM

कुटुंब न्यायालयाने नोंदविले निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: २१व्या शतकातही महिलांची मासिक पाळी व तिच्या पेहरावावरून छळवणूक होते, असे निरीक्षण नोंदवित वांद्रे कुटुंब न्यायालयाने वडाळा येथील रहिवाशाची घटस्फोट याचिका फेटाळली. ‘महिलांची मासिक पाळीवरून आणि तिच्या पेहरावरून छळवणूक होते, हे दुर्दैव आहे. ज्यासाठी महिलांना वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वत:ची निवड असायला हव्यात, अशा मूलभूत क्रियाकल्पांवरही पुरुष नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे निरीक्षण न्या. ए. एच. लड्ढाड यांनी नोंदवित ४४ वर्षीय पतीने घटस्फोटासाठी केलेली याचिका फेटाळली.

मार्च २०१५ मध्ये संबंधित दाम्पत्याचा विवाह झाला आणि काही दिवसांतच दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. विवाहानंतर चार महिन्यांतच पत्नीने सासरचे घर सोडले. सप्टेंबर २०१६ मध्ये पतीने कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. पत्नी घरची कामे करत नाही, तिचा सहकार्य करण्याचा स्वभाव नाही.

तसेच आपल्या कुटुंबीयांसमोर ती आपला अपमान करते, अशी कारणे देत पतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. तर दुसऱ्या बाजूला पत्नीने तिच्यावरील आरोप फेटाळत पतीवर आणि तिच्या कुटुंबीयांवर आरोप केले. घरात साडीशिवाय अन्य कोणताही पेहराव करण्यास मनाई आहे. पंजाबी ड्रेस, नाईट ड्रेसही घालू दिला जात नाही, असा आरोप पत्नीने केला.

बहीण, आईला स्वातंत्र्य मात्र पत्नीला नाही!

‘याचिकादारालाही (पती) बहीण आणि आई आहे. त्या दोघींना त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, पत्नीला तिच्या मनासारखे वागता येत नाही, हे दुर्दैव आहे, असे न्यायालयाने म्हटले. याचिकादार स्वत:च्या चुकीचा फायदा घेत आहे. त्याचे आचरण दोषमुक्त नाही, असेही न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :मासिक पाळी आणि आरोग्य