लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पावसाळ्यात समुद्र सफारीसाठी मुंबईकर रोरो बोटीला पसंती देत आहेत. गेल्या दोन महिन्यात ६० हजार पेक्षा जास्त जणांनी रोरो बोटीतून प्रवास केला आहे. याशिवाय स्वातंत्र्य दिनाला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी रोरो बोटीची तिकिटे आरक्षित केल्याने रोरो बोट हाऊसफुल्ल झाली. यामुळे मांडवा, अलिबागला ४६ मिनिटांत पोहोचता येणार आहे.
रामदास बोटीच्या अपघातानंतर पावसाळ्यात प्रवाशी फेरीबोटीला बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून पावसाळ्यात फेरीबोटी बंद असतात. त्यामुळे मांडवा आणि अलिबागला जाणाऱ्या प्रवाशांना पावसाळ्यात रस्तेमार्गाने जावे लागते. मात्र, रोरो बोटमुळे आता पावसाळ्यातही जलप्रवासी वाहतूक शक्य झाली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात खवळलेल्या समुद्र आणि उंच उठणाऱ्या लाटांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि मुंबईकरांनी रोरो बोटीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे पावसाळ्यात रोरो बोटी हाऊसफुल्ल धावत आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून प्रत्येक आठवड्यात रोरो बोटीतून साधारण ७ हजारपेक्षा जास्त प्रवासी आणि १४०० वाहनांची वाहतूक केली जात आहे. जून ते जुलै या दोन महिन्यांपासून ६० हजारपेक्षा जास्त पर्यटक आणि १२ हजार वाहनांनी रोरो बोटीतून प्रवास केला आहे.
रोरोचे तिकीट अगोदरच आरक्षित
रोरो बोट १५ ऑगस्टनिमित्त जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी अगोदरच रोरो बोटीचे तिकीट आरक्षित झाले आहे. त्यामुळे जवळजवळ ऑगस्ट महिन्याच्या वीकेन्डच्या दिवसांत रोरो बोट हाऊसफुल्ल झाली.
एकाच वेळी नेता येणारी वाहने १४५ प्रवासी क्षमता ५०० मुंबई ते मांडवा प्रवास (मिनिटे) ४६.