राजधानीतही आरोग्य व्यवस्था सलाइनवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 05:33 AM2023-10-16T05:33:04+5:302023-10-16T05:33:23+5:30
रुग्णालयात मनुष्यबळाच्या वाणव्यासोबत औषधांचा तुटवडा आहे.
- संतोष आंधळे
मुंबई : के. इ. एम. आणि जे. जे. ही दोन रुग्णालये देशभरातील रुग्णांसाठी हक्काची ठिकाणे आहेत. येथे रुग्णास दाखल केले म्हणजे आपला रुग्ण बरा होणार या मोठ्या उमेदीने लोकं इथे येतात. मात्र, या सार्वजनिक आरोग्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सध्या सलाइनवर असल्याचे चित्र आहे.
मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येणारे, केइएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालय तर शासनाच्या अधिपत्याखाली येणारे जे जे या पाच वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित रुग्णालयात मोठ्या आजारांच्या गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. सध्याच्या घडीला या पाचही रुग्णालयात मोठ्या संख्यने रुग्ण या रुग्णालयात येत असल्याने त्याचा ताण येथील आरोग्य व्यवस्थेवर आहे. या रुग्णालयात मनुष्यबळाच्या वाणव्यासोबत औषधांचा तुटवडा आहे. त्यावर मात करण्यासाठी महापलिका आणि सरकार प्रयत्न करत असले तरी अजूनही या गोष्टी मिळण्यासाठी मोठा काळ जावा लागणार आहे.
‘जेजे’त २०% पदे रिक्त
जे जे समूह रुग्णालयात, महत्त्वाचा मानला जाणाऱ्या मेडिसिन विभागात अध्यापकांच्या ८, तर बधिरीकरण शास्त्र विभागात ६, बालरोग विभागात ४ पदे रिक्त आहेत. तसेच अन्य विभाग मिळून एकूण २० टक्के अध्यापकांची पदे रिक्त आहेत.