Join us

"केंद्र सरकारमध्येही सगळेच हुशार असतात असं नाही"; फडणवीसांनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 1:31 PM

मुंबईतील वरळीपासून ते मरीन ड्राइव्हच्या दिशेनं जाणारी कोस्टल रोडची मार्गिका आज खुली करण्यात आली आहे.

मुंबई - राजधानी मुंबईतील बहुप्रतिक्षीत कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राइव्ह अशा एका मार्गिकेचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुंबईकरांना कोस्टल रोडच्या या मार्गिकेवरुन मंगळवारपासून प्रवास करता येणार आहे. पण सध्या आठवड्यातील पाच दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ही मार्गिका खुली असणार आहे. तर, शनिवार आणि रविवारी या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. मुंबईचा हा कोस्टल मार्ग आता श्रेयवादाची लढाई लढताना दिसून येत आहे. त्यावरुन, भाषण करताना देवेंद्र फडणवीसांनी कोस्टल रोडचा इतिहास आणि आजपर्यंतचा प्रवासच उलगडला. विशेष म्हणजे याकामी दिल्ली दरबारीही त्यांना झालेला त्रास, किंवा त्यांनी घेतलेले परिश्रम त्यांनी कथन केले.   

मुंबईतील वरळीपासून ते मरीन ड्राइव्हच्या दिशेनं जाणारी कोस्टल रोडची मार्गिका आज खुली करण्यात आली आहे. या मार्गिकेमुळे पाऊण तासाचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत करणं शक्य होणार आहे. दरम्यान, या लोकार्पण सोहळ्यात श्रेत्रयवादी लढाई उघड झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. देवेंद्र फडणवीसांनी कोस्टल रोडच्या कामाचा घटनाक्रम सांगितला. तसेच, याकामी आलेल्या अडचणींचा पाढाच वाचला. या अडचणी सोडवताना घडलेल्या प्रसंगाचीही माहिती फडणवीसांनी आजच्या लोकार्पण सोहळ्यातील भाषणातून दिली. 

देशात मोदी सरकार आणि राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही या प्रवासाला सुरुवात केली. केंद्र सरकारसोबत ५ बैठका झाल्या, यातील प्रत्येक अडचणीवर मार्ग आम्ही काढू लागलो, रिक्लेमेशनमुळे सीआरझेडची लाईन बदलणार नाही, हे आम्ही अंडरटेकींग केंद्र सरकारला दिलं. त्यानंतर, संबंधित मार्ग परिसरात इमारत बांधकामांना परवानगी न देण्याचंही आम्ही मान्य केलं. तरीही, केंद्र सरकारमधील एका अधिकाऱ्याने हा मार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला असावा, अशी मागणी केली. त्यासोबतच या मार्गावरुन ट्राम चालवण्याचंही त्यांनी दिलं. शेवटी केंद्र सरकारमध्येही सगळेच फार हुशार असतात असं नाही, असे म्हणत केंद्र सरकारमधील काही अधिकाऱ्यांनी आडकाठी आणल्याचं फडणवीसांनी म्हटलं. मात्र, मी मंत्र्यासोबत बैठका घेऊन, देशात मोदी सरकार आहे, आधुनिक यंत्रणेवर काम करणारं सरका आहे. मग, ट्राम म्हणजे आपण कुठल्या जमान्यात चाललो, असे सांगत मुद्दा पटवू दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

डॉ. संजय मुखर्जी आणि प्रविण परदेशी यांनी या सगळ्या अडचणींतून मार्ग काढले. मला आजही आठवतं की, जी एक बैठक झाली त्या बैठकीत मी नाराज झालो. मी मोदीजींकडे जातो आणि तक्रार करतो की हा विभाग तुमच्या सरकारप्रमाणे चालत नाही, मी म्हटलं, तुम्हाला मोदींनी स्पष्टपणे सांगितलं आहे, तुम्हाला तत्काळ यास मान्यता द्यायची आहे. दीड वर्षे मी चकरा मारतोय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ५-५ बैठका घेतो, तरीही यास मान्यता मिळत नाही म्हणत मी नाराजी व्यक्त केली. स्व. अनिल माधव दवे हे पर्यावरण मंत्री होते, ते आजारी होते. तरीही ते रुग्णालयातून एका बैठकीसाठी आले. आज यास मान्यता द्यायची आहे, येत्या दोन दिवसांत आम्ही अंतिम नोटीफिकेशन देतोय, असे त्यांनी मला सांगितले. अनिल दवेंनी अंतिम नोटीफिकेशन काढलं आणि पुढील १५ ते २० दिवसांत ते आपल्यामध्ये राहिले नाहीत, त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांच्यामुळेच या रोडसाठी अंतिम मान्यता मिळाली, असा किस्सा देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण सोहळ्यातील कार्यक्रमात सांगितला. तसेच, या अडचणींवर मात केल्यानंतर उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात आम्ही लढाई जिंकलो आणि हे काम सुरू झालं, असेही फडणवीस म्हणाले. 

आता, जे लोकं दावा करत आहेत की, आमच्या काळात झालं. त्यांचेच लोक या कामासाठी वसुली करत होते. येथे असणारे अधिकारी व संबंधित कंपनीच्या लोकांकडून मला हे सांगण्यात येत होते. एवढा दबाव या सर्वांवर होता. हा रस्ता पूर्ण झाला केवळ सत्ताबदल झाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनले, नाहीतर अजून २-५ वर्षे हा रस्ता पूर्ण झाला नसता, असेही फडणवीस यांनी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुळेच कोळी समाजालाही हा रस्ता होताना न्याय मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री खंबीर होते, आणि पूर्ण ताकदीने ते प्रकल्पाच्या पाठिशी राहिले, अडवणूक दूर केली. 

मला भूमिपूजनालाही बोलावलं नाही

आमच्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे हेही लोकांना कळलं पाहिजे, हे सगळं करुन मी आणलं, पण ज्यावेळी याचं भूमिपूजन करायचं होतं, रातोरात भूमिपूजन ठरवलं. मी मुख्यमंत्री होतो, तरी मला भूमिपूजनलाही उद्धव ठाकरेंनी बोलवलं नाही, अशी खंत देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली. तसेच, श्रेयाकरिता आम्ही कधीच लढलो नाही, कारण मी मुख्यमंत्री होतो, मी भूमिपूजन रोखू शकलो असतो, आयुक्तांना ते सांगूही शकलो असतो. पण, आम्हाला मुंबईचा विकास हवाय, आमच्यापेक्षा मुंबई मोठी आहे, आमच्या श्रेयापेक्षा मुंबई मोठी आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. एखादा देवेंद्र फडणवीस राहिल, जाईल. पण, मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण करु शकलोय, त्यामुळे मुंबईकर जन्मभर आपलं नाव घेणार आहेत. त्यामुळे, कोत्या मनाची लोकं काय असतात, आणि मोठ्या मनाची लोकं काय असतात हे निश्चितपणे आपल्याला यातून लक्षात येईल, असेही फडणवीसांनी म्हटलं. 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेमुंबईकेंद्र सरकार