लॉकडाऊन काळात आणि निर्बंधात शाळा बंद असल्याने शिक्षक पगाराची आर्थिक घडी आणखी विस्कटली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नवीन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरू होत असताना विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये अतिशय निरुत्साह, नाराजी व निराशाजनक वातावरण दिसून येत आहे. या विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्च २०२०च्या टाळेबंदीनंतर काहींना काही महिने तर काहींना अर्धाच तर काही शिक्षकांना पगार मिळालेलाच नाही. त्यामुळे हा प्रश्न फक्त एका शिक्षकापुरता मर्यादित न राहता तो त्या कुटुंबाचा व लाखो व्यक्तींच्या जीवनमरणाचा झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने युद्धपातळीवर शक्य ती आर्थिक मदत व गरजू शिक्षकांसाठी मदतीचा हात पुढे करावा. तसेच त्या सगळ्यांच्या पगाराच्या माहितीचे सर्वेक्षण करून त्यांना योग्य तो न्याय द्यावा व निराशेच्या गर्तेतून बाहेर काढावे, अशी मागणी आम्ही शिक्षक संघटनेेने केली आहे.
मार्च २०२० पासून शाळा बंद झाल्या व आजतागायत त्या व्यवस्थित सुरू होऊ शकल्या नाहीत व तिसऱ्या लाटेबाबत चर्चा सुरू असताना पुढे किती दिवस बंद असतील याची कोणालाच कल्पना नाही. परंतु, कोरोनामुळे उद्भवलेल्या अतिशय बिकट परिस्थितीत शिक्षकांची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. सरकार या मराठी शाळांना अनुदान देत नाही व मराठी शाळा चालवणाऱ्या संस्थाही जी काही थोडीफार शुल्क आकारतात ती येऊ न शकल्याने पगार देऊ शकले नाहीत, अशी माहिती आम्ही शिक्षक संघटनेशी संबंधित संस्थाचालक आणि शिक्षक देत आहेत. आता या शिक्षकांनी जगायचे कसे? घरी लहान मुले, आई-वडील यांचे पालन-पोषण, आजारपण कसे करायचे असे जीवन-मरणाचे प्रश्न उभे राहिले आहेत व अजूनही परिस्थिती सुधारताना दिसत नसल्याने ते खचून गेले आहेत. ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या या शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण झाले असल्याची प्रतिक्रिया मराठी अभ्यास केंद्र संलग्न आम्ही शिक्षक संघटनेचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी दिली.
पगार नसल्याने वैयक्तिक त्रास होऊनही शिक्षकांनी त्यांचे ज्ञानदानाचे काम सोडले नाही, शिक्षक आजही नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन स्वागत करणार निश्चित मात्र उपाशीपोटी झोप येत नाही त्याप्रमाणे शिकविण्याचा उत्साहही या शिक्षकांमध्ये किती असेल, हा प्रश्न अनुत्तरित असल्याची प्रतिक्रिया शेजुळे यांनी दिली. शासनाने शाळांच्या इतर समस्याप्रमाणेच विनाअनुदानित विशेषतः मराठी शाळांतील शिक्षकांच्या वेतन समस्येकडे लक्ष द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
..............................