मुंबई - अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होऊन मंदिराचे लोकार्पण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही तापलं असून आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच भाजपाने राम मंदिर लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू केल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. तर, राज्यातील शिवसेनाउद्धव ठाकरे आणि शिंदे गटातून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन एकेमकांवर हल्लाबोल केला जातो. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत शिंदे गटासह भाजपावरही हल्लाबोल करतात. श्री राम मंदिर उभारल्याच्या जागेवरुन त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.
मंदिर वही बनाएंगे... असा नारा देणाऱ्यांनी मंदिर नीट जाऊन पाहावं. अयोध्येतील राम मंदिर मुख्य स्थळापासून ३ ते ४ किलोमीटर दूर बांधलं आहे. ज्या ठिकाणी अयोध्येत राम मंदिर बनवण्याचं ठरलं होतं. त्या ठिकाणी ते मंदिर बनलं नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊतांच्या या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.
''ज्यांचा राम मंदिर आंदोलनात कसलंही योगदान नाही, अशाप्रकारचे लोकं असे आरोप करुन स्वत:चं हसू करुन घेत आहेत. तसेच, कोट्यवधी हिंदूचा अपमान करत आहेत. आता तरी उबाठा सेनेनं अशाप्रकारे हिंदूचा अपमान करणं बंद करावं,'' असे प्रत्त्युतर देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आम्हाला उबाठा असं म्हणू नका, असे म्हटले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हणा, मी उभा ठाकलेला आहे, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेत उबाठा म्हणत त्यांना डिवचंल होतं. आता, फडणवीसांनी उबाठा सेना म्हणत पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं आहे.
दरम्यान, राम मंदिर हा राजकीय मुद्दा बनत असून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्याच शाब्दीक हल्लाबोल पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून संजय राऊत सत्ताधारी भाजपा नेत्यांना लक्ष्य करतात. दुसरीकडे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची पत्रकार परिषद होत आहे. त्या पत्रकार परिषदेत ते, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर भाष्य करणार आहेत.