Join us

तिसऱ्या दिवशीही पोयसर नदीत वाहून गेलेल्या 'त्या' मुलाचा शोध अजून सुरूच

By मनोहर कुंभेजकर | Published: July 21, 2023 5:10 PM

एनडीआरएफची टीम झाली दाखल

मुंबई-दिंडोशी विधानसभा  क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३९ येथील क्रांतीनगर राजीव गांधी शाळेच्या वरती वन विभागातून वाहणाऱ्या पोयसर नदीत चंदन (घोडेलाल)दिलीप सहा (वय २५) वर्ष राजीव गांधी चाळ, क्रांतीनगर, आकुर्ली रोड कांदिवली (पूर्व) हा तरुण पावसाच्या पाण्यामुळे गेल्या बुधवारी दुपारी वाहून गेला होता. अजून पर्यंत त्याची शोधमोहिम सुरच आहे.

गेल्या बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात पश्चिम उपनगरातील नद्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली.यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या पोयसर नदीला पूर आल्याने यात क्रांतीनगर येथील २५ वर्षाचा तरुण वाहून गेला होता.आज तिसऱ्या दिवशीही या मुलाचा अजून शोध लागला नसल्याने त्याचे कुटुंबिय आणि येथील नागरिक चिंतेत आहे.

त्यामुळे एनडीआरएफ,फायरब्रिगेड व राज्य शासनाने शोध मोहीम हाती घेवून या तरुणाला शोधून काढावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधी मंडळ मुख्य प्रतोद,आमदार सुनील प्रभू यांनी काल विधानसभेत केली होती.

दरम्यान आज सकाळ पासून एनडीआरएफची १२-१३ जणांची टीम याठिकाणी कार्यरत असून येथील प्रत्येक नाले बघत ही टीम या मुलाचा शोध घेत असल्याची माहितीशाखाप्रमुख शाखाप्रमुख रमेश कळंबे यांनी लोकमतला दिली.

स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी शिवसैनिकांना शोध मोहिम घेण्यासाठी घटनास्थळी पहिल्या दिवशीच सदर घटना समजताच पाचारण केले असून  आम्ही सुद्धा अजून या मुलाचा शोध घेत असल्याचे  कळंबे यांनी सांगितले. सदर तरुण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या पोयसर नदीत गेल्या बुधवारी दुपारी तो उतरला होता.त्याला वाचवण्याचा दुसऱ्या तरुणाने प्रयत्न केला, मात्र तो हातातून निसटून पाण्याचा प्रवाह जोऱ्यात असल्याने खेचला जात हा तरुण वाहून गेला अशी माहिती त्यांनी दिली.

तर याप्रकरणी कुरार पोलिसांनी देखिल मोठे सहकार्य केले असून स्वतः येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गाढवे आणि पोलिस निरीक्षक जाधव येथे जातीने हजर होते.पोलिस हवालदार राजू जाधव , शांताराम गोमासे ,रियाज काजी, महेश गायकावाड ,प्रशांत बागल,राजू कांबळे तसेच विभागातील कार्यकर्ते विनायक काळे, युषुप पठान , सुरेंद्रकुमार रायँ ,दीपक जैस्वाल बाबू फिंटिंग,ग्राहक कक्ष संघटक अमोल सोनकांबळे आणि शिवसैनिक सदर तरुणाचा अजून शोध घेत असल्याचे कळंबे म्हणाले.