मान्सूनच्या परतीपूर्वीच मुंबईकर उकाड्याने त्रासले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 03:27 AM2020-10-09T03:27:21+5:302020-10-09T03:27:34+5:30
भारतीय हवामान खात्याच्या वेळापत्रकानुसार, ८ ऑक्टोबर रोजी मान्सून मुंबईतून परतीचा प्रवास सुरू करणार होता. मात्र हवामानात सातत्याने बदल होत असून, परतीचा मान्सून अद्यापही गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशासह उत्तर अरबी समुद्रातच आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी हवामानात झालेल्या घडामोडींनी मुंबईकरांना घाम फोडला. सकाळी ढगाळ हवामान, दुपारी किंचित ऊन, तर कुठे ढगाळ हवामान अशा तापदायक वातावरणाचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागला.
भारतीय हवामान खात्याच्या वेळापत्रकानुसार, ८ ऑक्टोबर रोजी मान्सून मुंबईतून परतीचा प्रवास सुरू करणार होता. मात्र हवामानात सातत्याने बदल होत असून, परतीचा मान्सून अद्यापही गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशासह उत्तर अरबी समुद्रातच आहे.
मुंबईत गुरुवारी सकाळपासून पावसाचे वातावरण होते. सकाळीच पावसाचे ढग जमा झाले होते. दुपारीदेखील सर्वसाधारण असेच चित्र होते. मात्र कालांतराने ढगांआडून डोकविणारा सूर्य मोकळ्या आकाशात आला आणि कडाक्याचे ऊन पडले. त्यामुळे ‘आॅक्टोबर हिट’चा तडाखा मुंबईकरांना जाणवू लागला.
दरम्यान, ९ आॅक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अंतर्गत भागात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत १० आॅक्टोबरपासून पावसाचे प्रमाण वाढेल. ही स्थिती पुढचे ६, ७ दिवस राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.