Join us

शिवशाही बसेसही सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:09 AM

मुंबई : अनलॉकनंतर आता साध्या बसेसपाठोपाठ शिवशाही बसेसही सुसाट धावताना दिसत आहेत. मुंबईतील २० पैकी २० बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी ...

मुंबई : अनलॉकनंतर आता साध्या बसेसपाठोपाठ शिवशाही बसेसही सुसाट धावताना दिसत आहेत. मुंबईतील २० पैकी २० बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहेत. यात शिर्डी, नाशिक, त्रंबक, दापोली या मार्गांवर प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद असल्याचे सांगण्यात येत आहे. यातून ‘राज्य मार्ग परिवहन मंडळाची तिजोरीही भरत आहे.

जिल्ह्यात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस आता जवळपास पूर्ण क्षमतेने धावताना दिसत आहेत. बसस्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे. सुरुवातीला साध्या बसेसच प्रवाशांच्या सेवेत सोडण्यात आल्या होत्या. परंतु प्रवाशांची गर्दी आणि वाढता प्रतिसाद पाहता आता शिवशाहीही वाढविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील २० शिवशाहीपैकी २० बसेस सेवेत धावत असल्याचे सांगण्यात आले.

बसेसचे दररोज सॅनिटायझेशन

बसेस धावण्यापूर्वीच आगारांमध्ये बसेस स्वच्छ धुवून त्यांचे सॅनिटायझेशन केले जात असल्याचे सांगण्यात आले. तसेच सर्व प्रवाशांना गर्दी न करण्याबाबत व तोंडाला मास्क लावण्याबाबत आवाहन केले जाते. चालक, वाहक यासाठी जास्त मेहनत घेत असल्याचे दिसून आले.

मुंबई विभागात एकूण पाच आगारांतून ३७९ बस चालवल्या जातात. मात्र, सध्या २१९ बस सुरू आहेत. दीड वर्षात कोरोनामुळे पाचही आगारांची वाताहत झाली आहे. मात्र, आता गणेशोत्सवाच्या पाच आगारांतून फेऱ्यात वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे एसटी वाहतूक कमी करण्यात आली होती. निर्बंध शिथिल केल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ झाली होती. मात्र, गणेशोत्सवामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे.

--

आगारातून दररोज बसेसचे सॅनिटायझेशन केले जाते. कोणतीच बस सॅनिटायझेशनशिवाय डेपोतून बाहेर पाठविली जात नाही. प्रारंभी बसेस पाण्याने स्वच्छ केल्या जातात. प्रवास लांबचा असल्यामुळे चालक-वाहकांनाही मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या जातात. प्रवाशांनाही मास्कबाबत विचारणा केली जाते.

----

शासनाच्या आदेशाप्रमाणे शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. सध्या तरी या बसेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ

--

एकूण आगार ५

एकूण शिवशाही बसेस २०

चालू शिवशाही बसेस २०

----

या मार्गावर सुरू आहेत ‘शिवशाही’

मुंबई ते शिर्डी

मुंबई ते नाशिक

मुंबई ते अहमदनगर

मुंबई ते जुन्नर

मुंबई ते त्रंबक

मुंबई ते दापोली