१०० युनिटखालील छोट्या वीज ग्राहकांनाही शॉक, बिलाच्या रकमेत केली सरासरी १६ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 07:30 AM2020-07-06T07:30:14+5:302020-07-06T07:30:22+5:30
वीज ग्राहकांनी ही सर्व वस्तुस्थिती समजावून घेत वीज दरवाढीविरोधात असंतोष प्रकट करावा, असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केले आहे.
मुंबई : महावितरणने आपल्या संकेतस्थळावर ग्राहकांच्या बिलाचा पूर्ण तपशील दिला आहे. यामध्ये जुने आणि नवे वीज दर स्पष्टपणे नमूद केले आहेत. स्थिर आकार, वहन आकार आणि वीज आकार ही एकूण वाढ १०० युनिटच्या आतील ग्राहकांसाठी सरासरी १६ टक्के तर १०० युनिटवरील ग्राहकांसाठी एकूण सरासरी वाढ १३ टक्के आहे आणि या वाढीव वीज दराने वीज ग्राहकांना वीज बिले आली आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी ही सर्व वस्तुस्थिती समजावून घेत वीज दरवाढीविरोधात असंतोष प्रकट करावा, असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केले आहे.
घरगुती वीज ग्राहकांचे १ एप्रिलच्या आधीचे दर व १ एप्रिलपासून वाढलेले सध्याचे दर यांच्या तपशिलाचा विचार केल्यास, वीज बिलातील स्थिर आकार पूर्वी दरमहा ९० रुपये होता. आता तो १०० रुपये झाला. वहन आकार प्रति युनिट १ रुपया २८ पैसे होता. तो आता १ रुपया ४५ पैसे झाला. वीज आकार पहिल्या १०० युनिटसाठी ३ रुपये ५ पैसे प्रति युनिट होता. तो आता ३ रुपये ४६ पैसे आहे. १०० युनिटच्या पुढील १०१ ते ३०० युनिटपर्यंतचा दर पूर्वी ६ रुपये ९५ पैसे प्रति युनिट होता. तो आता ७ रुपये ४३ पैसे झाला. ३०० युनिटच्या पुढील ३०१ ते ५०० युनिटपर्यंतचा दर पूर्वी ९ रुपये ९० पैसे प्रति युनिट होता. तो आता १० रुपये ३२ पैसे प्रति युनिट झाला. स्थिर आकार, वहन आकार आणि वीज आकार ही एकूण वाढ १०० युनिटच्या आतील ग्राहकांसाठी सरासरी १६ टक्के आहे आणि १०० युनिटवरील ग्राहकांसाठी एकूण सरासरी दरवाढ १३ टक्के आहे. या वाढीव वीज दराने वीज ग्राहकांना वीज बिले आली आहेत. मुळात २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू असतानाही महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने ३० मार्च रोजी दरवाढीचा निर्णय जाहीर केला. १ एप्रिलपासून नवीन वीज दर लागू होतील, असे जाहीर केले. या वेळी वर्तमानपत्रेही उपलब्ध नव्हती आणि निर्णय विलंंबाने झाल्याने लॉकडाऊन म्हणून तात्पुरता स्थगित ठेवला असता तर नुकसान झाले नसते, असे संघटनेचे म्हणणे आहे.
महावितरणचे मौन
फेब्रुवारी २०२० चा इंधन समायोजन आकार १ रुपया ५ पैसे प्रति युनिट मूळ सरासरी देयक दरात समाविष्ट केला. त्यामुळे २०१९-२० चा सरासरी देयक दर ६ रुपये ८५ पैसे प्रति युनिटऐवजी ७ रुपये ९० पैसे प्रति युनिट गृहीत धरला. हा देयक दर ७ रुपये ९० पैशाहून ७ रुपये ३१ पैसे प्रति युनिटवर आणला म्हणजे दरकपात केली, असे दाखविले. प्रत्यक्षात सरासरी देयक दर ६ रुपये ८५ पैसे प्रति युनिटवरून ७ रुपये ३१ पैसे प्रति युनिट याप्रमाणे वाढविला. ही दरवाढ ०.४६ रुपये प्रति युनिट म्हणजे ६.७ टक्के होती. याबाबत महावितरणने मौन धारण केले आहे.