लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील अनेक महिन्यांपासून सायन-ट्रॉम्बे मार्गावरून लालडोंगर परिसरात येणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडलेले पेव्हर ब्लॉक, फुटलेल्या जलवाहिन्या व मलनिस्सारण वाहिन्या यामुळे रस्त्यावर नेहमी घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य असते. यामुळे भर उन्हाळ्यातही लालडोंगरवासीयांना चिखलाच्या व मलमिश्रित पाण्याच्या रस्त्यातून ये-जा करावी लागत आहे. लालडोंगर परिसरात प्रवेश करतानाच नागरिकांना खड्ड्यांचा व मलनिस्सारण वाहिनीमधून रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याचा सामना करावा लागतो.
लालडोंगर परिसरात मोठी नागरी वस्ती असल्यामुळे या मार्गावर नेहमी वर्दळ असते. गेली अनेक वर्षे या मार्गाची दुरुस्ती न झाल्याने येथून महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना चालताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या परिसरात विकासकामे सुरू असल्याने ट्रक व डंपर यांची सतत ये-जा सुरू असते. या गाड्यांची चाके खड्ड्यातून गेल्यावर खड्ड्यांमधील चिखल थेट नागरिकांच्या अंगावर उडतो. खड्ड्यांमध्ये साठलेल्या चिखलामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष देऊन रहिवाशांची या त्रासातून मुक्तता करावी, अशी मागणी होत आहे.