लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मतदान केल्यानंतर केंद्राबाहेर येऊन लगेच सेल्फी काढायचा तुमचा विचार असेल तर तो डोक्यातून काढून टाका. कारण मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मग मोबाइल स्विच ऑफ करून खिशात टाकून मतदानाला जाऊ, असा तुमचा विचार असेल तर तोही काही कामाचा नाही. कारण अगदी स्विच ऑफ मोबाइललाही मतदान केंद्रावर परवानगी नाही. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी शुक्रवारी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
मुंबईतील सहा आणि महामुंबईतील चार लोकसभा मतदारसंघांत सोमवारी, २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. मतदान प्रक्रिया राबविताना काही नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आहेत. त्यात मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यायवर असलेल्या कर्मचारी वगळता इतरांना मोबाइल बाळगण्यास मनाई आहे. यासंदर्भातील माहिती समाज माध्यमांवरही देण्यात आली आहे. मोबाइल कुठे ठेवावा, याबाबत मतदारांच्या मनात गोंधळ आहे.
... तर काय करणार?
सध्या कडक उन्हाळा आहे. उन्हाचा त्रास झाल्यास संपर्काचे साधन म्हणून मोबाइल उपयुक्त ठरतो. काही अडचण उद्भवल्यास पटकन संपर्क साधता येतो. अशावेळी मतदान केंद्रावर मोबाइल नाही नेला तर करणार काय, असा मतदारांचा प्रश्न आहे.
चोकलिंगम म्हणतात...
मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला, नातेवाइकाला वा मित्राला सोबत न्यावे. जेणेकरून त्यांच्याकडे मोबाइल सोपवून मतदानास जाता येईल. मतदारांची गैरसोय लक्षात घेता मतदान केंद्राबाहेर तीन खोके आणि त्यांचे टोकन ठेवावे, अशी काही व्यवस्था करता येईल का, यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्राद्वारे विनंती केली आहे. त्यावर लवकर उत्तर अपेक्षित असून त्याबाबत पुन्हा माहिती देण्यात येईल, असे चोकलिंगम म्हणाले.