मुंबई : रिवार्ड पॉईंट रीडिंग करण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून लाखोंची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. भामट्यांच्या या लुटीच्या जाळ्यात व्यावसायिक, बिल्डर, शिक्षकांपाठोपाठ आता डॉक्टरही अडकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंधेरीत राहणारे डॉ. पवनकुमार पिपाडा (६७) हे वांद्र्यातील नामांकित रुग्णालयात रुग्णसेवा करतात. २९ फेब्रुवारी रोजी नेहमी प्रमाणे सायंकाळच्या सुमारास ते रुग्णालयात असताना एका अनोळखी नंबरवरून ९ हजार ८५० रुपयांचे रिवार्ड पॉईंट मिळण्याची लिंक आली. त्या लिंकवर क्लिक करून त्यांनी बँकेच्या डेबिट कार्डचा नंबर नमूद केला. त्यानंतर एक ओटीपी प्राप्त झाला. तोही त्यांनी लिंकमध्ये टाईप केला. काही क्षणात त्यांच्या बँकेच्या खात्यातून १ लाख ८४ हजार ९९७ रुपये ट्रान्सफर झाले.
व्यावसायिकाला गंडा :
विलेपार्ले पूर्व परिसरात जयप्रकाश रणदिवे (७७) या व्यावसायिकाला रिवार्ड पॉईंटचा मेसेज पाठवत त्यांच्या खात्यातून ४ लाख २६ हजार ४९८ रुपये काढण्यात आले. याप्रकरणी त्यांनी ५ मार्च रोजी विलेपार्ले पोलिसात तक्रार दिली आहे.
बिल्डरलाही चुना :
वांद्रे पोलिसांच्या हद्दीत फतू निहालनी (७०) या बिल्डरला देखील २ मार्च रोजी रिवार्ड पॉईंट जिंकल्याची लिंक पाठवत ती क्लिक केल्यावर त्यांच्या बँक खात्यातून ४ लाख ३९ हजार रुपये काढून घेण्यात आले. याप्रकरणी त्यांनी वांद्रे पोलिसात तक्रार दिली आहे.
मालाड पश्चिम याठिकाणी निर्मल जैन (५९) यांना बँकेच्या नावाने ९ हजार ८५० रुपयांचे रिवॉर्ड पॉइंट भेटले असून ते आज एक्सपायर होतील, असा मेसेज आला. त्यावेळी त्यांनी त्यामध्ये असलेल्या लिंकवर क्लिक केले आणि त्यांची जवळपास १ लाख ८८ हजारांची फसवणूक झाली.
शिक्षिकाही फसली :
मोबाईलवर एसबीआय बँकेचे रिवार्ड पॉईंट रीडिंग करण्याच्या नावाखाली मेसेज मार्फत पाठवण्यात आलेल्या लिंकमुळे ४२ वर्षीय शिक्षिकाही फसली. ती आणि तिच्या पतीच्या सामायिक खात्यातून ५ लाख २४ हजार ९९९ रुपये काढण्यात आले. याप्रकरणी त्यांनी बोरिवली पोलिसात धाव घेतली आहे.