मुंबई : स्वत:चे घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असले तरी बनावट कागदपत्रे, पैसे घेऊन फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. आपण फसलो की, पोलिस ठाण्यात धाव घेतो. मात्र, गेल्या काही महिन्यात पोलिसांनाही भामट्यांनी गंडवल्याच्या घटना घडल्याने सामान्य नागरिकांनी आता कोणाच्या तोंडाकडे बघायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
घर घेताय? मग पडताळाच
बांधकाम व्यावसायिकाचे परवानापत्र, मंजूर नकाशा, सिटीसर्व्हे उतारा, प्लॉटचा मंजूर नकाशा, कमीत कमी तीन वर्षे अनुभवी असलेल्या वकिलाकडून घेतलेला जागेचा सर्च रिपोर्ट, जागेची एनए ऑर्डर कॉपी, मुखत्यारपत्र, बिल्डर व पूर्वीच्या मालकाचे जमिनीचे खरेदीखत झेरॉक्स, जमीन खरेदीखताची झेरॉक्स, प्रोजेक्ट फायनान्स असेल तर त्याची करारनामा कॉपी, याअंतर्गत त्या प्रकल्पातील प्रत्येक वास्तूवर किती कर्ज ट्रान्सफर झाले हे पडताळा.
बिल्डरकडून घराचा ताबा मिळण्यास उशीर झाल्यास महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (रेरा)कडे संपर्क साधता येईल. सेवांच्या कमतरतेसाठी तुम्ही ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावू शकता. तसेच जर फसवणुकीचे प्रकरण असेल तर भारतीय दंड संहिता कलम ४२० अंतर्गत पोलिसात तक्रारदेखील केली जाऊ शकते.-ॲड. विशाल सत्यप्रकाश सक्सेना, सर्वोच्च न्यायालय
स्वस्त घर महागात :
मेघवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वैभव माळी यांना स्वस्तात घर मिळवून देण्याचे आश्वासन देत १३ लाखांचा चुना लावण्यात आला. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी नवलराठी उर्फ नवल बजाज (४५) याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
जेव्हा पोलिसानेच फसवले :
दादरमध्ये घर मिळवून देण्याच्या नावाखाली सेवानिवृत्त सहायक पोलिस निरीक्षक रमेश सावंत (६३) यांना पोलिस उपनिरीक्षकाने १७ लाखांचा चुना लावला. या प्रकरणी इमान उर्फ बाबा पटेल या पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जो पुणे लोहमार्ग येथील पोलिस दलाच्या श्वानपथकात कार्यरत होता.
बाँडपेपरवर गॅरंटी, तरी पलटी :
मी मेलो तरी पैसे बुडणार नाहीत, असे बॉण्ड पेपरवर पोलिस हवालदार अशोक भरते (५२) यांना लिहून देत घर मिळवून देण्याच्या आमिषाने १५ लाखांचा गंडा घातला. याविरोधात जोगेश्वरी पोलिसांनी सलील सांबारी आणि भरतेंचा विद्याधर शिरोडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.