Join us

अंथरुणाला खिळलेलेही होणार कोरोनाच्या भयातून मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:06 AM

मुंबई : आजारी व अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांना लस देत, सुरक्षित राहण्याचा अधिकार सर्वांनाच असल्याचे महापालिकेने ...

मुंबई : आजारी व अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांना लस देत, सुरक्षित राहण्याचा अधिकार सर्वांनाच असल्याचे महापालिकेने दाखवून दिले. जोगेश्वरी पूर्व येथील वृद्धांसाठी असलेल्या केंद्रातील वृद्धांचे लसीकरण शुक्रवारी करण्यात आले. के पूर्व (जोगेश्वरी, अंधेरी पूर्व) विभागातील दोनशे लाभार्थ्यांना लस मिळणार आहे. त्यानंतर २ ऑगस्टपासून संपूर्ण मुंबईत अशा ४,४६६ लाभार्थींना घरीच लस मिळणार आहे.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत ७० लाख २० हजार नागरिकांनी लस घेतली आहे. सर्व वयोगटातील नागरिक, परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, स्तनदा माता आणि आता गर्भवती महिलांसाठीही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, आजारपण, शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्रांवर येणे शक्य होत नाही. अशा व्यक्तींना त्यांच्या घरीच जाऊन लस देण्याची मागणी केली जात होती.

यासाठी के पूर्व विभागात प्रयोग

मात्र, या मोहिमेच्या मार्गातील अडचणी व त्याचे यश, अपयश जाणून घेण्यासाठी महापालिकेने जोगेश्वरी, अंधेरी पूर्व या विभागात प्रायोगिक तत्वावर शुक्रवारपासून लसीकरण सुरू केले आहे. या विभागात दोनशे लाभार्थी आहेत. यापैकी २० व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात आली. जोगेश्वरी पूर्व येथील डॉ. निरंजन वाघ यांच्या वृध्द गृहातील ९५ वर्षांच्या तीन आणि ७५ वर्षांच्या वृद्धांना लस देण्यात आली.

संपूर्ण मुंबईत सोमवारपासून लसीकरण

मुंबईत अशा ४,४६६ लाभार्थ्यांची यादी तयार ठेवण्यात आली आहे. प्रोजेक्ट मुंबई या बिगर शासकीय संस्थेच्या सहकार्याने पालिकेचे आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन या लाभार्थ्यांना सोमवारपासून लस देणार आहे. मात्र, यासाठी संबंधित व्यक्तीचे संमतीपत्र व डॉक्टरचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.

-----------------

के पूर्व विभागातील दोनशेपैकी २० व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. अंधेरी विभागात रुग्णालयांचे प्रमाण अधिक असल्याने या विभागाची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेतील अडचणी जाणून घेण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे. त्यानंतर सोमवारपासून संपूर्ण मुंबईत लसीकरण केले जाणार आहे.

- सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)

यांना मिळणार लस

अशी व्यक्ती पुढील किमान सहा महिने अंथरुणाला खिळून राहणार असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासह लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमतीपत्र संबंधित व्यक्ती, नातेवाईक यांना प्रशासनाला सादर करावे लागेल.

प्रतिक्रिया

आजारी व्यक्तीलाही घरी येऊन लस देण्याचा पालिकेचा उपक्रम खूप चांगला आहे. सकाळी पालिकेच्या पथकाने येऊन लस दिली. मात्र, अद्याप कोणताही त्रास झालेला नाही.

- दया जोशी (वय ७९ वर्षे, अंधेरी पूर्व)